बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तब्येत बिघडली, पाटणातील मेदांता रुग्णालयात दाखल

nitish-kumar-pti

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. त्यांना उपचारांसाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळच्या सुमारास नितीश कुमार यांच्या हाताला वेदणांनी कळा येत होत होत्या. त्यामुळे त्यांना तात्काळ पाटणातील मेंदात रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे हाडांच्या रोगांचे विशेषतज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर देखरेख ठेऊन असून काही चाचण्याही केल्या जात आहे. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

गेल्या काही महिन्यांपासून नितीश कुमार हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्येही ते प्रचारासाठी पोहोचले. निकालानंतर सरकार स्थापन करण्यातही त्यांची भूमिका असल्याने त्यांना वारंवार दिल्लीला धाव घ्यावी लागत होती. तसेच शुक्रवारी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठकही घेतली होती. तीन-चार महिन्यांपासून त्यांची चांगलीच धावपळ सुरू आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायडेट पक्षाने चांगली कामगिरी केली. बिहारमध्ये जदयूने एकूण 12 जागांवर विजय मिळवला. या निकालानंतर केंद्रात एनडीएचे सरकार बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. याचा फायदाही त्यांना झाला. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये जदयूच्या दोन नेत्यांना स्थान मिळाले.

आता 29 जून रोजी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. मात्र तत्पूर्वीच नितीश कुमार यांची तब्येत बिघडली. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून जदयूच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.