बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीत सामील होण्याच्या ऑफरबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर हात जोडले आणि स्पष्ट नकार दर्शवला. आमचे दरवाजे नितीश कुमार यांच्यासाठी सदैव खुले आहेत, त्यांनाही दरवाजे उघडूनच बसायला हवे, असे लालूप्रसाद यादव म्हणाले होते. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता नितीश कुमार यांनी उत्तर देणे टाळले.
नितीश कुमार सोबत आले तर त्यांचे स्वागतच असेल. त्यांनी सोबत यावे, एकत्र काम करावे. ते सतत पळ काढतात, पण आम्ही त्यांना माफ करू, असे लालूप्रसाद यादव म्हणाले होते. एक दिवसापूर्वीच लालूप्रसाद यांनी दिलेल्या या ऑफरनंतर आज राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या शपथविधी सोहळय़ाला तेजस्वी यादव आणि नितीश कुमार आमने-सामने आले.
नितीश कुमार थकल -तेजस्वी यादव़
लालूप्रसाद यांच्या ऑफरवर प्रसारमाध्यमांनी राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रश्न विचारला असता, पत्रकारांचे प्रश्न टाळण्यासाठी लालूप्रसाद यादव तसे म्हणाले होते. नितीश कुमार यांना महाआघाडीत घेणे म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱहाड मारून घेणे. मी आधीच सांगितले आहे, नितीश कुमार यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद आहेत. तसेच त्यांचे या वर्षी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणे ठरलेलेच आहे, असा विश्वासही व्यक्त केला. शेतात 20 वर्षांपासून एकाच जातीचे बियाणे टाकले तर शेत आणि पीक दोन्ही उद्ध्वस्त होईल. त्यासाठी आता वेळ आली आहे की नव्या जातीचे बियाणे टाकले पाहिजे.