
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मागील काही दिवसांपासून त्यांच्या हास्यास्पद विधानांमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. आज विधानसभेत पुन्हा एकदा त्यांचा तोल गेला आणि मोबाईल फोनमुळे 10 वर्षात जग नष्ट होईल, असा दावा त्यांनी केला. सभागृहाचे अधिवेशन सुरू असताना एक आमदार मोबाईल फोन वापरताना आढळला आणि नितीश यांचा संयम सुटला. मुख्यमंत्र्यांनी यावर आक्षेप नोंदवण्यासाठी उभे राहून विधानसभेत मोबाईल फोनवर बंदी घालण्याची विनंती सभापतींना केली.
ते म्हणाले की, आता लोक मोबाईलवर बोलत आहेत. पूर्वी त्यावर बंदी होती. आता सगळेच मोबाईलचा वापर करू लागले आहेत. हे काही चांगले आहे का? त्यामुळे सभापतींनी कोणीही मोबाईल घेऊन येऊ नये असे आदेश द्यावे. मोबाईल वापरावर प्रतिबंधित आहे. पण, मागील पाच ते सहा वर्षांपासून ते पुन्हा सुरू झाले. मोबाईल फोनच्या वापरामुळे 10 वर्षात जग नष्ट होईल. आधी मलादेखील मोबाईलची खूप आवड होती पण नंतर ते सोडून दिले.
संगणक निरक्षर मुख्यमंत्री – तेजस्वी
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर बोचरी टीका केली. ‘कोणत्या सदस्याला प्रश्न विचारायचा असेल तर मोबाईल अथवा टॅबचा वापर करावाच लागतो. मात्र, बिहारच्या संगणक निरक्षर मुख्यमंत्र्यांना हेही खटकत आहे. तंत्रज्ञानाविरुद्ध, विद्यार्थी आणि महिलांच्या विरोधात असलेला मुख्यमंत्री बिहारला लाभला हे दुर्दैव आहे’, अशी टीका तेजस्वी यांनी ‘एक्स’द्वारे केली.