स्वप्ननगरीत घर मिळेना झाले…पोस्ट शेअर करत ‘बिग बॉस 18’ स्पर्धकाने व्यक्त केली खंत

‘बिग बॉस 18’ संपला असला तरी त्याचे स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणाने अजूनही चर्चेत आहेत. या शोमधील वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळालेली स्पर्धक यामिनी मल्होत्राही सध्या चर्चेत आली ते सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे. मुंबईसारख्या स्वप्ननगरीत घर खरेदी करायला अडचणी येत असल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.

यामिनी मल्होत्राने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. नमस्कार मित्रांनो, मी एक गोष्ट शेअर करू इच्छित आहे जी निराशाजनक आहे. माझे मुंबईवर जेवढे प्रेम आहे तेवढेच इथे घर मिळणे फार कठीण झाले आहे. घर शोधल्यानंतर मला अनेक प्रश्न विचारले गेले आहेत, जसे की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम?, गुजराती आहात की मारवाडी? एवढेच नाही तर मी अभिनेत्री आहे हे ऐकताच अनेकांनी लगेच नकारही दिला आहे. पुढे तिने लिहिले की, मी एक अभिनेत्री आहे म्हणून मला घर मिळण्याचा हक्क नाही का? 2025 मध्येही हे असे प्रश्न विचारण्याची लोकांची मानसिकता आहे, हे धक्कादायक आहे. आपण खरोखरच मुंबईला स्वप्नांचे शहर म्हणू शकतो का? असे पहिल्यांदाच घडले नाही. याआधीही अनेक कलाकारांनी अशाप्रकारच्या अडचणींचा सामना केला आहे.

यामिनी मल्होत्राने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. पण ती अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही.