गुजरातमध्ये पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठा घोटाळा, आरोपीला पोलीस कोठडी; जबरदस्तीने अँजिओप्लास्टी केलेल्या दोघांचा मृत्यू

‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असे म्हणणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू केलेल्या पंतप्रधान जन आरोग्य योजनेतदेखील गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यातील आरोपी कार्तिक पटेलला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कार्तिकच्या रुग्णालयात पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत 2 रुग्णांवर जबरदस्तीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर या रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कार्तिक पटेल फरार झाला होता. शनिवारी रात्री तो दुबईहून परतल्यानंतर त्याला अहमदाबाद विमानतळावरून अटक करण्यात आली. कार्तिक आणि त्याच्या टीमने रुग्णांच्या चाचणी अहवालात 30 ते 80 टक्के ब्लॉकेज दाखवले. जेणेकरून पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे लाभ घेता येतील. या योजनेंतर्गत 956 दिवसांत साडेतीन हजारांहून अधिक दावे करण्यात आले. 3 हजार 800 अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. रुग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया कार्तिकच्या सूचनेनुसार झाल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

अनेक अधिकारीही गुंतले असण्याची शक्यता

पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे अधिकारी या घोटाळ्यात गुंतले असण्याची शक्यता आहे. याबाबतचा तपासही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कार्तिक त्यांना भेटवस्तू देत होता की लाच देत होता, याचाही तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

डॉक्टरांना रुग्ण पाठवण्यासाठी पगार

बनावट शस्त्रक्रिया आणि दाव्याच्या प्रकरणात कार्तिक पटेल हा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या रुग्णालयातील दाव्यांमध्ये आरोपीचा वाटा किती आहे. याबाबतच्या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. अहमदाबाद आणि आसपासच्या डॉक्टरांना पगार दिला जात असे. हे डॉक्टर रुग्णांना कार्तिकच्या रुग्णालयात पाठवत असत अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.