शेअर बाजारात मोठी गुंतवणूक; सेबी, सॅटने सावध राहावे, सरन्यायाधीशांचा सावधगिरीचा सल्ला

घटनापीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.

शेअर बाजारात सध्या ऐतिहासिक तेजी पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 80 हजारांचा टप्पा पार केला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 24 हजारांपार गेला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात शेअर बाजारात पैसा गुंतवत आहेत. हे लक्षात घेता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सेबी आणि सॅटने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत.

मुंबईतील मित्तल कोर्ट येथील सॅटच्या नवीन पीठाचे उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलताना त्यांनी शेअर बाजारातील तेजीवर भाष्य केले. शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणावर व्यवहार होत असल्यामुळे सॅट आणि सेबीवरील जबाबदारी प्रचंड वाढली असून कामाचा ताणही वाढला आहे. अशा स्थितीत स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करण्यासाठी सेबी आणि सॅटसारख्या संस्था महत्त्वाची भूमिका निभावतात. गुंतवणूकदारांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी या संस्था सावध राहतील आणि योग्य ती काळजी घेतील, अशी अपेक्षा सरन्यायाधीशांनी व्यक्त केली.

गुंतवणूक सुरक्षितच
शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित असून समस्या सोडवण्यासाठी प्रभावी यंत्रणा काम करत आहेत, असा विश्वास गुंतवणूकदारांना आहे. यामुळे आगामी काळात शेअर बाजारात गुंतवणूक वाढेल, असा विश्वासही सरन्यायाधीशांनी व्यक्त केला.