सावधान… मोठ्या आतड्यांचे कॅन्सर रुग्ण वाढले; मूळव्याध, घटणारे वजन, पोटांच्या विकाराकडे दुर्लक्ष करू नका

बदलती जीवनशैली आणि व्यसनांचे वाढलेले प्रमाण यामुळे मोठ्या आतड्यांच्या (कोलोरेक्टल) कॅन्सर रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन दशकांपूर्वी कोलोरेक्टल कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येच्या मागे 30 रुग्ण इतके होते. मात्र आता हेच प्रमाण थेट 70 रुग्णांपर्यंत वाढले आहे. या विकाराचे रुग्ण थेट चौथ्या स्टेजमध्ये उपचारासाठी येत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. कोलोरेक्टल कॅन्सरचे पहिल्या स्टेजमध्ये निदान करण्यासाठी मूळव्याध, घटणारे वजन, पोटांचे विकार, स्टूलमधून होणारा रक्तस्त्राव याकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण अमेरिकेत सर्वाधिक आहे. त्यानंतर युरोपियन राष्ट्राचा नंबर लागतो. अमेरिकेत एक लाख लोकसंख्येमागे सुमारे ३०० तर युरोपियन देशात 150 रुग्ण या विकाराचे विकारायला आता वाढू लागले आहेत. या रुग्णांवर लागण झाल्याबरोबर प्राथमिक स्तरात उपचार करण्यासाठी अपोलो कॅन्सर सेंटरने कोलफिट स्क्रीनिंग उपक्रम सुरू केला आहे. या टेस्टमुळे कोलोरेक्टल कॅन्सरची लागण होणार आहे की नाही हेही स्पष्ट होणार आहे.

मूळव्याध, मलातून होणार रक्तस्त्राव याकडे सुरुवातीला रुग्ण दुर्लक्ष करतात. नंतर जेव्हा त्रास वाढतो त्या वेळेस ते उपचारासाठी येतात. तोपर्यंत हा कॅन्सर थेट चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचलेला असतो. रुग्णाला वाचवताना डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागते. जर याच रुग्णांनी सुरुवातीलाच कोलफिट स्क्रीनिंग करून घेतले तर त्याची या जीवघेण्या विकारातून सुटका होणार आहे, असे अपोलोच्या कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. अनिल डिक्रूज यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. राजेश शिंदे, पुरुषोत्तम वशिष्ठ, डॉ. दीपक गुप्ता, ज्योती वाजपेयी आदी उपस्थित होते.

बीपी, शुगरपाठोपाठ स्टूलची टेस्टही महत्त्वाची
सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्य निरोगी ठेवणे मोठे आव्हान ठरले आहे. निरोगी आरोग्यासाठी अनेक जण बीपी, शुगर, ईसीजी आदी टेस्ट नियमितपणे करीत असतात. याच सर्व टेस्टबरोबर आता स्टूलची टेस्टही आवश्यक बनली आहे. स्टूलच्या टेस्टमधून मोठ्या आतड्यांचा कॅन्सर आहे की नाही हे लगेच समजून येते, असे डॉ. राजेश शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.