कॅनडा सरकारने स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम (SDS) हा उपक्रम आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ प्रभावाने बंद केला आहे. शुक्रवारी इमिग्रेशन, रिफ्युजी अँड सिटीझनशिप कॅनडाने (IRCC) जारी केलेल्या माहितीनुसार, हा निर्णय 8 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. एसडीएस हा उपक्रम 2018 मध्ये हिंदुस्थानसह 14 देशांतील विद्यार्थ्यांसाठी कॅनडामध्ये शिक्षण घेण्याची प्रक्रिया जलद करण्यात मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला होता.
आयआरसीसीहे (IRCC) म्हणणे आहे की, या निर्णयाचा उद्देश विद्यार्थ्यांची असुरक्षा कमी करणे आणि अर्ज प्रक्रिया सर्व विद्यार्थ्यांसाठी सामान बनवणे आहे. दरम्यान, एसडीएस अंतर्गत अर्जांचा स्वीकृती दर जास्त होता आणि चार आठवड्यांची जलद प्रक्रिया होते, तर विद्यार्थ्यांच्या अर्जांवर आता नियमित प्रवाहात प्रक्रिया केली जाईल.
ग्लोबायन इमिग्रेशन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष नरेश चावडा यांनी सांगितलं की, एसडीएस स्ट्रीम 2018 मध्ये हिंदुस्थान आणि चीनमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. नंतर ती अधिक देशांमध्ये विस्तारली गेली. यामुळे विद्यार्थ्यांना भाषेची पात्रता, आर्थिक बांधिलकी आणि कॅनेडियन महाविद्यालय किंवा विद्यापीठाकडून स्वीकृतीचे पत्र मिळाल्यावर सोपी प्रक्रिया प्रदान केली जात होती. चार आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होत होती आणि अंदाजे 95 टक्के अर्ज मंजूर होत होते.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना चावडा म्हणाले, एक विशेष कार्यक्रम अचानक बंद केल्याने विद्यार्थी कॅनडा सोडून इतर देशांकडे शिक्षणासाठी वळू शकतात.