
सध्या उन्हाळ्याचे तीव्र दिवस सुरू असून जलाशय व तलाव आटल्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी शहरी भागाकडे वळावं लागत आहे. अशाच एका घटनेत आज चंद्रपूर जिल्हा ग्राहक न्यायालयात एका घोरपडीने बस्तान मांडल्याने एकच तारांबळ उडाली. या अनोख्या पाहुण्यामुळे न्यायालयात येणाऱ्या नागरिकांनी कौतुकाने गर्दी केली. काही वेळाने न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची माहिती वनविभाग आणि इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना दिली. यानंतर तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या वन्यजीव मित्रांनी घोरपडीला काळजीपूर्वक पकडून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे निसर्गमुक्त केले.सुदैवाने कोणतीही हानी न होता घोरपडीची सुखरूप सुटका करण्यात आली.