Bhushi Dam : लग्नासाठी आग्र्याहून पुण्यात आलेले अन्सारी कुटुंबीय, पावसाळी पिकनिक बेतली जीवावर

लोणावळा शहरातील भुशी धरणात रविवारी पिकनिकला आलेलेल एकाच कुटुंबातील पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील चार जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे.

या धरणात बुडालेले सर्वजण हे मुळचे दिल्लीचे असून ते एका लग्नकार्यासाठी आग्र्याहून पुण्यात आले होते. 27 जून रोजी लग्नकार्य पार पडल्यानंतर सर्व कुटुंबियांनी पावसाळी पिकनिकचं प्लॅनिंग केलं. त्यासाठी पुण्याहून दोन तासांवर असलेल्या व खूप प्रसिद्ध असलेल्या भुभी धरणाची निवड करण्यात आली. 30 जून रोजी परिवारातील 17 जण पुण्याहून लोणावळा येथे आले. भुशी धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या धबधब्याजवळच्या प्रतिबंधित भागात हे सगळे जण गेले होते. ते सर्व जण धबधब्याच्या पाण्यात खेळत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे या कुटुंबातील सात जण पाण्यात अडकले. हे सातही जण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले मात्र त्यातील दोन जण हे पाण्यातून सुखरूप बाहेर आले तर पाच जण बुडाले.

शाहिस्ता लियाकत अन्सारी (37), अमिना सलमान ऊर्फ आदिल अन्सारी (13, रा. सय्यदनगर, हडपसर) आणि उमेरा सलमान ऊर्फ आदिल अन्सारी (8), मारिया अकिल अन्सारी (9), अदनान सबाहत अन्सारी (4) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप मारिया अकिल अन्सारी ही बेपत्ता आहे.

‘भुशी डॅमच्या पाठीमागील डोंगरावरून वाहणारा धबधबा आणि त्याचा प्रवाह धोकादायक आहे. तिथे ‘प्रवेश बंद’चे फलकही लावले आहेत. तरीही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांकडे संख्याबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी आम्ही लक्ष देऊ शकत नाही’, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक म्हणाले.