
ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालय हे भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक शाखेसारखे काम करत आहे, असा आरोप छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केला आहे. बघेल यांनी आज ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात पत्रकार परिषद घेतली.
ईडीने 2015 मध्ये याबाबतचा खटला बंद केला होता. परंतु, नंतर नवीन एफआयआर नोंदवला. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बराच काळ चौकशी करण्यात आली. आम्हाला आरोपपत्राबाबतची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली असे बघेल म्हणाले.
नॅशनल हेरॉल्ड हे राजकीय षड्यंत्र – कन्हैया कुमार
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण हे कायदेशीर नाही तर राजकीय षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केला. भाजप विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी आणि लोकांचे महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ईडी ही मोदी-शहा यांची वसुली गँग – पवन खेरा
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केलेले आरोपपत्र हे एक राजकीय षड्यंत्र आहे. गांधी पुटुंबातील प्रत्येक सदस्याला भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून ईडी ही मोदी- शहा यांची वसुली गँग आहे, असा आरोप काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला.