लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीवर भुवनेश्वर पोलिसांकडून अत्याचार, पोलीस कोठडीतच केला लैंगिक छळ

एका लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीवर पोलीस कोठडीत लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रभारी निरीक्षकासह पाच पोलिसांना ओडिशाच्या महासंचालकांनी निलंबित केले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये पोलिसांना रक्षकऐवजी भक्षक बनवले जात आहे, अशी टीका या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे.

ही महिला भरतपूर येथील तिचे उपाहारगृह बंद करून आपल्या नियोजित पतीसह रात्री परतत असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवून दुर्वर्तन केले होते. त्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या दोघांची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी अधिकाऱ्यालाच मारहाण करून अटक करण्यात आली. या अटकेला विरोध करणाऱ्या महिलेलाही कोठडीत डांबण्यात आले.

ओडिशा पोलीस हडबडले, पाच जण निलंबित

या महिलेने पत्रकार परिषदेत जाहीर आरोप केल्यानंतर ओडिशा पोलीस हडबडले. भरतपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकासह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी निरीक्षक दिनकृष्ण मिश्रा, उपनिरीक्षक बैसालिनी पांडा, सहाय्यक उपनिरीक्षक सलिलामोयी साहू, सागरिका रथ आणि कॉन्स्टेबल बलराम हांडा यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वैद्यकीय तपासणीत तिच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

प्रियंका गांधी भडकल्या

जिथे जिथे भगवा पक्ष सत्तेत आहे, तिथे पोलिसांना रक्षकांऐवजी भक्षक बनवण्याच्या धोरणावर काम सुरू आहे, अशी टीका सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. इतके होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपच्या महिला खासदार गप्प असल्याबद्दलही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.