बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आता त्याच्या कुटुंबियांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भोपाळमधील पतौडी कुटुंबाची मालमत्ता मध्य प्रदेश सरकार ताब्यात घेण्याची शक्यता आहे. सैफची तब्बल 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत सरकार ताब्यात घेऊ शकते.
सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांची वारसाहक्काने मिळालेली मोठी संपत्ती भोपाळमध्ये आहे. भोपाळच्या कोहेफिजा ते चिक्लोडपर्यंत त्यांच्या मालकीची जमिन असून त्यातील सुमारे 100 एकर जमिनीवर दीड लाख लोक राहतात. या मालमत्तेवर 2015 पासून मध्य प्रदेश न्यायालयाची स्थगिती आहे. पतौडी कुटुंबानं 2015 मध्ये एक याचिका दाखल करत सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर कोर्टाने या संपत्तीवर सरकारचे नियंत्रण आणण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान, आई शर्मिला टागोर, बहिणी सोहा आणि पतौडीची बहीण सबीहा सुलतान यांना शत्रू मालमत्ता प्रकरणात अपील प्राधिकरणासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. आता अअधिकाऱ्यांसमोर खटला सादर करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा कालावधी संपूनही पतौडी कुटुंबाने कोणताही दावा सादर केलेला नाही. त्यामुळे सरकार ही संपत्ती ताब्यात घेऊ शकते. मात्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता पतौडी कुटुंबीय या आदेशाला खंडपीठात आव्हान देऊ शकतात असेही समजते.