बनावट एडिशनल एसपी असल्याचं भासवत एका महिलेने पोलिसांचीच फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवानी चौहान असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने भोपाळ पोलीस ठाण्यात जाऊन तेथील इतर अधिकाऱ्यांना आपला धाक दाखवण्या प्रयत्नही केला. मात्र एका चूकीमुळे एएसपीचा यूनिफॉर्म परिधान करून पोलिसांना त्रास देणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी एडिशनल एसपीच्या यूनिफॉर्ममध्ये टीटी नगर पोलीस ठाण्यात पोहोचली होती. एसपीच्या यूनिफॉर्मसाठी तिने इंदूरमधील पोलीस कॅन्टीनसमोर असलेल्या दुकानातून पोलिसांचा युनिफॉर्म, बेल्ट आणि शूज खरेदी केले होते. एडिशनल एसपीचा गणवेश कसा दिसतो, त्यावर अशोक चिन्ह आणि स्टार आहेत आणि ते कसं लावलं जातं, हे सर्व ती यूट्यूबवर पाहून शिकली. त्यामुळे तिने एडिशनल एसपीचा गणवेश त्यांची कामाची पद्धत या सगळ्याची तयारी केली होती.
पूर्वतयारी करून शिवानी एडिशनल एसपीच्या यूनिफॉर्ममध्ये टीटी नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती. ती तेथील हेड कॉन्स्टेबलला आपण अधिकारी असल्याचं सांगायची. त्यामुळे तेथील टीआय आणि एसीपी हे सगळेच तिला सॅल्यूट करायचे. यावेळी तिने ती 2018 च्या बॅचमधील असल्याचं सांगितलं. या बॅचला अद्याप प्रमोशन देण्यात आलेलं नाही. हे अधिकाऱ्यांना माहीत होतं त्यामुळेच शिवानीची सर्वांसमोर पोलखोल झाली. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.