
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतीने प्लॅस्टिक बंदीचा ठराव केला. गावात पेट बॉटल क्रश मशीन बसवण्यात आले असून एकेरी वापर केलेले एक किलो प्लॅस्टिक जमा केल्यास सरपंच अरुण वाघ यांनी मानधनातून अर्धा किलो साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतीने याआधी सरपंच अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून ‘माझी वसुंधरा 0.4 अभियानां’तर्गत अनेक उपक्रम राबवत 50 लाखांचे बक्षीस मिळवले आहे. आता ‘0.5 अभियाना’तही भोकणी ग्रामपंचायत सहभागी झाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात यापूर्वीच लोकनेते शंकरराव वाजे पतसंस्थेच्या सीएसआर निधीतून पेट बॉटल क्रश मशीन व त्याशेजारी कापडी पिशव्यांचे व्हेंडिंग मशीन बसवण्यात आले आहे. सिंगल युज प्लॅस्टिक म्हणजेच बिस्किटे, चिप्स, मॅगीची रिकामी पाकिटे, बाटल्या असा कचरा ग्रामस्थ मशीनमध्ये टाकतात आणि कापडी पिशवी नेतात. त्यामुळे प्लॅस्टिक मुक्तीची संकल्पना राबवणे शक्य झाले. पेट मशीनमधील तुकडे विल्होळी येथील कंपनीस प्लॅस्टिक निर्मितीसाठी देण्यात येतात, यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडली आहे. यापुढेही अशीच पर्यावरणपूरक कामे करण्याचा मानस सरपंचांनी व्यक्त केला.