दादर स्थानकात कुटुंबासह ताटातूट, रस्ता भरकटलेल्या वृद्धेला भोईवाडा पोलिसांचा मदतीचा हात

बनारसहून त्या कुटुंबासह मुंबईला आल्या. दादर स्थानकात सर्व जण सुखरूप उतरले, पण स्थानकातून बाहेर येण्याच्या नादात वृद्धेची कुटुंबाबरोबर चुकामूक झाली. त्या रस्ता भरकटल्या आणि नागरिकांना विचारत भोईवाडा पोलीस ठाण्यात धडकल्या. पोलिसांनी लागलीच विचारपूस करून धारावीतील त्यांचे घर शोधले आणि त्या वृद्धेला कुटुंबीयांच्या स्वाधीन करून त्यांना मोठा दिलासा दिला.

बेलादेवी जयस्वाल (63) असे त्या वृद्धेचे नाव असून मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्या बनारसहून एक्सप्रेसने मुंबईत आल्या. दादर स्थानकात उतरल्यानंतर फलाटावरील गर्दीमुळे त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली. त्या रस्ता भरकटल्या. त्यामुळे नेमके जायचे कुठे ते त्यांना समजेनासे झाले. अखेर नागरिकांना विचारत त्या कशाबशा भोईवाडा पोलीस ठाण्यात पोहचल्या. ही बाब कळताच वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लावंड तसेच अंमलदार वाक्षे व महिला अंमलदार कांबळे यांनी वृद्धेकडे आस्तेवाईपणे विचारपूस करण्यास सुरुवात केली. बेलादेवी असे नाव सांगणाऱया वृद्धेला मुंबईतील घरचा पत्ता सांगता येत नव्हता. परंतु शीव सर्कल येथे गेल्यावर घराकडे जाणारा रस्ता दाखवू शकेन, असे त्यांनी सांगितले. पथकाने लगेच त्यांना शीव सर्कल येथे नेले. तेथे सर्वत्र चौकशी केली असता त्या धारावी पुंभारवाडा येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. मग पथकाने पुंभारवाडा गाठून बेलादेवी यांचे घर शोधले आणि त्यांना त्यांच्या मुलींच्या ताब्यात देण्यात आले.