भिवंडीत धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात भाविकांची चेंगराचेंगरी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

dhirendra-shastri

बागेश्वरधाम महाराज धीरेंद्रशास्त्री यांच्या भिवंडीतील कार्यक्रमात आज प्रचंड चेंगराचेंगरी झाली. धीरेंद्रशास्त्री यांच्याकडून अंगारा घेण्यासाठी आलेल्या हजारो भाविकांनी रेटारेटी करत स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. अनेक महिला व मुलांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. सुदैवाने पोलीस व सुरक्षारक्षकांनी गर्दीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, चेंगराचेंगरीची घटना पाहून धीरेंद्रशास्त्रींनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

बागेश्वरधाम महाराज धीरेंद्रशास्त्री यांचा भिवंडीतील दिवेअंजूर येथील इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदाम संकुलात सत्संग व दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात धीरेंद्रशास्त्री आपल्या भक्तांना अंगारा देणार होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्तगण या सोहळ्यासाठी उपस्थित होते. धीरेंद्रशास्त्री यांनी सत्संग व दर्शनाचा मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी 3 वाजता अंगारा देण्यासाठी प्रथम महिलांना व त्यानंतर पुरुषांना एका रांगेत उभे राहण्याचे आवाहन केले. मात्र अंगाऱ्यासाठी महिला व पुरुषांनी एकच झुंबड केली. काहींनी तर एकमेकांच्या अंगावर चढत स्टेजवर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रेटारेटीने भाविकांचा जीव गुदमरू लागला. महिलांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली. घाबरलेल्या लहान मुलांनी हंबरडा फोडला. ही भयंकर परिस्थिती पाहून धीरेंद्रशास्त्री यांनी कार्यक्रम अर्धवट सोडून काढता पाय घेतला. प्रसंगावधान राखत पोलिसांनी स्टेजच्या समोरील गर्दीत चेंगरलेल्या लहान मुलांना व महिलांना अक्षरशः ओढत बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

गर्दीत तुडवातुडवी झाली, रेलिंगही तुटले

धीरेंद्रशास्त्री यांनी माईकवरून अंगारा घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर भक्तांनी स्टेजच्या दिशेने एकच धावाधाव केली. व्यासपीठावर चढण्यासाठी सर्वांचीच चढाओढ झाली. या झटापटीत व्यासपीठासमोरील शिडीचे रेलिंग तुटल्याने काही महिला खाली पडल्या. मात्र त्यानंतरही एकमेकांना तुडवतच भक्तांनी बागेश्वरबाबांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करीत गदीं पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. त्यामुळे भाविकांचा जीव वाचला.