
डम्पिंग हटवा, भिवंडी वाचवा.. ठाणेकरांचा कचरा आमच्या दारात टाकलात तर खबरदार.. बंद करा बंद करा कचऱ्याचे डम्पिंग बंद करा, अशा घोषणा देत भिवंडीच्या पंचक्रोशीतील 20 गावांतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. विरोध डावलून आमच्या माथी डम्पिंग लादल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे ठाण्यापाठोपाठ आता भिवंडीच्या आतकोलीमध्ये कचऱ्यावरून रण पेटल्याने ठाणे महापालिकेची पुरती गोची झाली असून कचरा टाकायचा तर कुठे टाकायचा, असा प्रश्न पडला आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीत दररोज अंदाजे एक हजाराहून अधिक कचऱ्याची निर्मिती होते. हा संपूर्ण कचरा डंपरमार्फत आतकोली क्षेपणभूमी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेला जातो. अख्ख्या ठाणे शहराचा कचरा भिवंडीतील आतकोली गावाच्या हद्दीत डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जात असल्याने स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. या डम्पिंग ग्राऊंडविरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. स्थानिकांनी विरोध केल्यामुळे ठाणे पालिका प्रशासनाची डोकेदुखी आणखीन वाढणार आहे. दरम्यान तहसीलदार अभिजित खोले यांना डम्पिंग तत्काळ बंद करण्याचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी दिले आहे. या आंदोलनात खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते विश्वास थळे, संपर्कप्रमुख साईनाथ तारे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, विष्णू चंदे, जिजाऊ सामाजिक संघटनेच्या मोनिका पानवे, पंडित पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राकेश पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्यसह पंचक्रोशीतील सरपंच आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
प्रशासनाची कचराकोंडी
ठाणे शहरातील कचरा टाकण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या आतकोली येथील 86 एकर जमीन शासनाने ठाणे महानगरपालिकेस दिली आहे. क्षेपणभूमीतील पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षक भिंत, सुरक्षा कक्ष, पोहोच रस्ता, 22 एकरचे सपाटीकरण, बांबूचे वन आदी कामांसाठी राज्य शासनाने 50 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र कचरा टाकण्यास भिवंडीतही विरोध होऊ लागल्याने प्रशासनाची कचराकोंडी झाली आहे.
भिवंडी ग्रामीणच्या जनतेच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. शासनाला ही जागा ठाणे पालिकेच्या घशात घालताना स्थानिकांना विचारण्याची गरज पडली नाही का? ज्योती ठाकरे, उपनेत्या शिवसेना .
डम्पिंगमुळे विकास ठप्प होणार आहे.
हा प्रकल्प रेटला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच हा प्रकल्प माथी मारला जात असून या डम्पिंगला आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार. – सुरेश म्हात्रे, खासदार