
बठाण व उचेठाण येथील भीमा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात ठरवून दिलेल्या गौण खनिजच्या नियमाला डावलून रात्रंदिवस वाळू उपसा सदर ठेकेदाराकडून केला जात आहे. याबाबत महसूल अधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथे सततच्या वाळू उपशामुळे पाणी गढूळ होऊन हे अशुद्ध पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्याला जबाबदार कोण, अशी लेखी तक्रार मंगळवेढा साठेनगर येथील रहिवासी प्रकाश खंदारे यांनी राज्यपाल राधाकृष्ण सी. पी. यांच्याकडे केली आहे. तसेच हा ठेका तत्काळ रद्द करावा, अन्यथा 1 मे रोजी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही खंदारे यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बठाण व उचेठाण येथे गाळमिश्रित वाळूचा ठेका झाला असून, बठाण येथील वाळू उपशाबाबत गौण खनिजाचे जवळपास 12 ते 14 नियमांचे उल्लंघन केल्याने हा ठेका तात्पुरत्या स्वरूपात बंद केला होता.
उचेठाण येथे वाळू उपसा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येथून काही अंतरावरच मंगळवेढा शहर पाणीपुरवठा, भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा, आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा, जलजीवन पाणीपुरवठा, तसेच दोन्ही गावच्या स्थानिक नळ पाणीपुरवठा आदी असताना येथे वाळू उपशाचा परवाना दिलाच कसा, असा संतप्त सवाल येथील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सध्या भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने यारीच्या साहाय्याने वाळू बाहेर काढली जात असून, येथील पाणी अशुध्द बनत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सोलापूरमध्ये मागील पंधरा दिवसांपूर्वी दोन मुलींना अशुद्ध पाण्यामुळे जीव गमवावा लागता. एवढे असूनही बठाण येथे वाळू उपसा पुन्हा चालू करावा, या मागणीसाठी जिल्हा प्रशासनावर मंत्र्याकडून दबाव आल्याने पुन्हा वाळू उपसा सुरू करण्याची वेळ आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अशुध्द पाण्यामुळे नागरिकांचे जीव गेल्यास ठेकेदारासह संबंधित अधिकारी व मंत्री जबाबदार राहणार का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
या वाळू उपसावर अनेक वाहने बिगर पावतीचीच सापडली असून, ती महसूल कार्यालयासमोर आणूनही लावली आहेत. याचा आर्थिक फटका शासनास बसत आहे. सूर्यास्तानंतर वाळू उपसा करता येत नसतानाही रात्रीच्यावेळी वाळू उपसा केला जातो, मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पालकमंत्र्यांनी अवैध वाळू उपसा झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असा इशारा देऊनही परिस्थिती जैसे थे आहे, तर सर्वसामान्यांसाठी वाळूचे धोरण आखले असताना याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही होत आहे.
सदर ठेकेदारावर तत्काळ कारवाई करून बठाण व उचेठाण येथील वाळू ठेका तत्काळ बंद करावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. बठाण येथील वाळू ठेका बंद करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊन तक्रारी करून हा ठेका बंद केला होता. मात्र, तो पुन्हा सुरू झाला असून, याबाबत प्रशासनासह सामाजिक कार्यकर्तेही गप्प आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये विविध खमंग चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या संदर्भातील निवेदनाच्या प्रति राज्य शासनासह, सोलापूर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय प्रांत अधिकारी, मंगळवेढा यांना देण्यात आल्याचे प्रकाश खंदारे यांनी सांगितले.