10 हजार झाडांची कत्तल रोखण्यासाठी भाईंदरवासीय करणार चिपको आंदोलन, मेट्रो कारशेडसाठी एकही झाड तोडू देणार नाही; हरकतींचा वर्षाव

मेट्रोच्या कारशेडसाठी 9 हजार 999 झाडांची कत्तल म्हणजे मीरा-भाईंदर शहरला विकासाच्या नावाखाली भकास करण्याचा घाट आहे. त्यामुळे या झाडांना वाचवण्यासाठी चिपको आंदोलन करू, पण एकाही झाडावर कुऱ्हाड चालू देणार नाही, असा निर्धार भाईंदरवासीयांनी केला आहे. या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी एमएमआरडीएने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात नागरिकांनी हरकतींचा अक्षरशः वर्षाव केला आहे. इतका मोठा विरोध झाल्यामुळे मनमानी पद्धतीने निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो लाईन 9 व इतर मार्गिकांना थांबा देण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथे सरकारी जागेवर मेट्रो कारशेडची जागा निश्चित केली आहे. या कारशेडसाठी बाधित होणाऱ्या 9 हजार 999 वृक्षांची कत्तल करण्याचा घाट दोन्ही एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाने घातला आहे. या झाडांची कत्तल करण्यासाठी महापालिका व एमएमआरडीए प्रशासनाने जनतेला कोणतीच माहिती न देता नोटीस प्रसिद्ध केली. मात्र निसर्गाचा हा हास करण्यांचा घाट उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. उत्तन, पाली, चौक, डोंगरी व मीरा-भाईंदरमधील नागरिकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. निसर्गावर कुऱ्हाड फिरवून होणारा विकास आम्हाला नको अशी भूमिका घेतली. या कारशेडच्या विरोधात नागरिकांनी हजारो हरकती दाखल केल्या. हरकतींचा पाऊस पडल्यामुळे यावर एकत्र सुनावणी महापालिकेने घेतली. त्यावेळी नागरिक आक्रमक झाले. 50 वर्षांपूर्वीची ही झाडे वाचवण्यासाठी आम्ही चिपको आंदोलन करू, पण एकाही झाडावर कुऱ्हाड चालू देणार नाही, असा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला.

  • मेट्रो कारशेडसाठी होणारी झाडांची कत्तल ही नागरिकांना समजू नये यासाठी प्रशासनाने ही नोटीस एका सप्ताहिकामध्ये दिली. हे सप्ताहिक कुठे प्रसिद्ध होते हे कोणालाच माहिती नाही, असा आरोपही नागरिकांनी यावेळी केला.
  • परदेशात अनेक ठिकाणी मेट्रोची कारशेड ही भूमिगत आहेत. त्याच धर्तीवर भाईंदरमधील कारशेड तयार करण्यात यावे. जर कारशेड भूमिगत झाले तर निसर्गाचा कोणताही ऱ्हास होणार नाही, असेही मत अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.

हा विनाश तातडीने थांबवा !

डोंगराळ भाग हा मीरा-भाईंदर शहराला फुफ्फुस म्हणून ओळखला जातो मात्र एमएमआरडीएने या भागातील सुमारे 10 हजार झाडे हटवून तिथे मेट्रोचे कारशेड निर्माण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे मीरा रोड आणि भाईंदर शहरातील नागरिकांच्या जगण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार आहे. पर्यावरणाचा इतक्या मोठ्या प्रमाणात हास होणार असल्याने त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएने हा विनाश तातडीने थांबवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश पाल आणि वेलेनसिया मेन्डोंसा यांनी केली आहे.