वाहतूककोंडीतून भाईंदरकर प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी मेट्रोचा प्रकल्प मोठ्या उत्साहाने सुरू करण्यात आला. पण स्टेशन्सची उभारणी, एण्ट्री एक्झिट पॉइंटची रखडलेली कामे यांसह अनेक तांत्रिक बाबी अपूर्ण राहिल्याने एमएमआरडीएने दिलेली डिसेंबरची डेडलाईन अखेर चुकली आहे. दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा यावर्षी अखेरपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण हा भाईंदर मेट्रोचा टप्पा लटकल्याने नवीन वर्षातदेखील प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान मेट्रोचे स्वप्न साकारणार तरी केव्हा, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
एमएमआरडीएने मीरा-भाईंदर शहरामध्ये दोन टप्प्यांत मेट्रो सुरू होईल असे आश्वासन दिले. दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा असून दुसरा टप्पा काशीगाव ते भाईंदर असा आहे. पहिला टप्पा डिसेंबर 2024 व दुसरा टप्पा डिसेंबर 2025 मध्ये प्रत्यक्षात सुरू होणार होता. पण एमएमआरडीएच्या आस्ते कदम कारभारामुळे मेट्रो सुरू होऊ शकली नाही. राज्य सरकारने दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प क्रमांक 9 चे काम सुरू करण्यासाठी 9 सप्टेंबर 2021 रोजी मान्यता दिली. तसेच मे. जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीला वर्क ऑर्डरदेखील देण्यात आली.
■ एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता योजना पाटील यांनी भाईंदरमधील माजी नगरसेवक अजित पाटील यांना पत्र लिहून मेट्रो मार्ग 9 प्रकल्पाचे स्थापत्य काम 87 टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा केला आहे.
■रेल्वे स्थानकांची अंतर्गत कामे व मेट्रो फ्लॅटची कामे प्रगतिपथावर असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात अतिशय संथ गतीने मेट्रो प्रकल्प क्रमांक 9 चे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
■ भाईंदरचा मेट्रो प्रकल्प सहा वर्षांत पूर्ण करू, असे आश्वासन एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आले होते. पण हा कालावधी संपला तरी प्रकल्प सुरू झालेला नाही.
ही आहेत स्थानके
दहिसर ते काशीगाव या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामध्ये दहिसर, पांडुरंगवाडी, मीरा गाव व काशीगाव अशी स्थानके आहेत. या दरम्यानची इलेक्ट्रिक, रंगरंगोटी यांसह स्टेशनची उभारणी अद्यापि बाकी आहे. काही ठिकाणी तर पिलर्सही उभारलेले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षात तरी भाईंदरची मेट्रो धावणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे.