
‘अतिक्रमणांसंबंधी मनमानी (सुमोटो) न करता लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कारवाई करावी; अन्यथा याबाबत वेगळा विचार करावा लागेल,’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
‘अतिक्रमण हटाव’ संदर्भात कोपरगाव शिवसेना शहर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत वाकचौरे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्षे, संजय सातभाई, कैलास जाधव उपस्थित होते.
खासदार वाकचौरे म्हणाले, ‘मी दिल्लीहून परत आल्यानंतर अतिक्रमणांबाबत कोपरगाव आणि नेवासा येथून अनेक फोन आले. एकीकडे सरकार घर देते, तर जिल्हाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी जर लोकांना उद्ध्वस्त करत असतील, तर हे निषेधार्ह आहे.
लोकप्रतिनिधींऐवजी सर्वकाही अधिकारी ठरवत असतील आणि लोकांना उजाड करीत असतील, तर याबाबत आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल,’ असा इशारा वाकचौरे यांनी दिला. ‘लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लोकांच्या सुख दुःखांत सहभागी होता येणार नसेल तर काय उपयोग?’ असा सवाल करत, ‘प्रशासनाची ही मनमानी चालणार नाही. तातडीने हे थांबवा. स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या. जेथे अडथळा होतोय, तेथील अतिक्रमणे जरूर काढा; पण गरज नसताना जर अतिक्रमणे काढाल, तर हे चालू देणार नाही,’ असेही खासदार वाकचौरे यांनी सुनावले.
राजेंद्र झावरे म्हणाले, ‘जिल्हाभर अतिक्रमणांची मोहीम सुरू झाली आहे. कोपरगावला मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली असून, त्याच्या आत ठेकेदाराला रान मोकळे देऊन 227कोटींच्या मलनिःसारण टेंडरचा मलिदा खाण्यासाठीच अतिक्रमणांचा घाट घातला गेला आहे,’ असा गंभीर आरोप झावरे यांनी प्रशासनावर केला.