
देशाच्या घटनेला 75 वर्षे झाली म्हणून विधानसभेच्या सभागृहात चर्चा घडवली जात आहे; पण यानिमित्ताने तुम्ही विरोधी पक्षनेत्याची निवड केली असती तर तुमच्या कामकाजाला चार चाँद लागले असते. लोकशाहीत विरोधी पक्षाला सोबत घेऊन जात आहोत असे वाटले असते. पण भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्षनेता नको अशी भावना मनात ठेवू नका, अशा शब्दांत शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत उद्विग्नता व्यक्त केली
भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त ‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावरील चर्चेत भाग घेताना भास्कर जाधव यांनी घटनेचा दाखला देत आणीबाणीपासून लोकशाही, सत्ताधारी विरोधी पक्ष अशा विविध विषयांवर भाष्य केले.
घटनेला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून विधानसभेच्या सभागृहात चर्चा घडवली जात आहे. त्याच निमित्ताने तुम्ही विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड केली असती तर लोकशाहीचा सन्मान करता, लोकशाहीची सभ्यता राखता, बहुमान करता असे वाटले असते. कदाचित जर तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल तर लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी माझे पत्र मागे घेतो. तुम्हाला आमच्या शिवसेना पक्षप्रमुखांकडून किंवा महाविकास आघाडीकडून दुसऱ्या कोणाचे पत्र पाहिजे असेल तर देतो.
भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्षनेता नको अशी भावना मनात ठेवू नका. पद म्हणजे परमेश्वर नाही. मी कधीही पदाची लालसा ठेवली नाही. पण विरोधी पक्षनेत्याची निवड करा म्हणून अध्यक्षांना भेटलो. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. एक विरोधी पक्षनेता असता तर काय झाले असते, असा संतप्त सवाल भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना केला.
दहा टक्क्यांची अट कुठेही नाही
लोकशाही म्हणजे अखंड राज्य करण्याचा कोणाचाही अखंड अधिकार नव्हे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याची गरज घटनेत व्यक्त केली आहे. उद्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवड आहे. विरोधी पक्षनेत्यासाठी एकूण सदस्यांच्या दहा टक्के लोक लागतात की नाही लागत याची माहिती कायदेशीर पुराव्यासह सचिवालयाला दिली. सचिवालयाने पत्र दिले की, विरोधी पक्षनेता निवडीसाठी दहा टक्क्यांची अट कुठेही नाही. त्यांचे लेखी पत्र माझ्याकडे आहे.