महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पाठवून मिंधे सरकारने महाराष्ट्र दुबळा करण्याचा प्रयत्न केला आहे. जो महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर होता तो महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर नेऊन ठेवण्याचे पाप भाजपच्या तालावर नाचणाऱ्या मिंधे सरकारने केले असल्याचा खणखणीत आरोप गुहागर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी केला. ते रामपूर येथे झालेल्या प्रचार सभेत बोलत होते.
पुढे बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, मी विदर्भच्या दौऱ्यावर होतो तेव्हा गुहागर मतदारसंघातील प्रचाराचे फोटो मी व्हॉटसॲप वर पाहत होतो. तुम्ही प्रचाराचं रान उठवल आहात.असं प्रचाराचं उठवलेलं रान कधी पाहिलं नव्हतो म्हणून सांगतो 50 हजाराच्या मताधिक्याने आपण विजय मिळवायचा असल्याचा आत्मविश्वास आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. माझ्या समोर जो उमेदवार उभा आहे. तो तुम्हाला कधी येऊन भेटला का? तुम्हाला भेटायचं असेल तर त्याचं घर कुठे आहे माहित आहे का? आणि एक सांगतो माझ्या विरोधात जो उभा रहातो तो पराभूत झाला की मतदारसंघात फिरत नाही असा टोलाही त्यांनी हाणला.
भाजपाने प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे.राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू यांनी अपमान केला.मंगलप्रभात लोढा,रावसाहेब दानवे यांनी अपमान केला.काही दिवसांपूर्वी अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे.हा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही.अपमान करणाऱ्यांना आपण धडा शिकवायचा आहे असे आवाहन करताना आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले की,सिंधुदुर्गात राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला.त्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला.आज ८० वर्षांपूर्वी उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे दिमाखात उभे आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन केलेला पुतळा आठ महिन्यात कोसळतो हे दुर्देव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, नंदू शिर्के, प्रकाश साळवी, जितेंद्र चव्हाण,योगेश शिर्के,अंकुश काते, अनुजा चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.