
शिवसेनेने आपल्याला संधी दिली नाही असे मी कधीच बोललो नाही, जे माझ्या मनातही नाही त्याच्या बातम्या केल्या जाताहेत, अशी खंत शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव यांनी आज व्यक्त केली. मी जे बोललो ते कुणी दाखवलेच नाही, असे सांगत जाधव यांनी आपण नेमके काय बोललो होतो त्याबाबत आज स्पष्टही केले.
भास्कर जाधव यांनी आज चिपळूण येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत वस्तुस्थिती मांडली. 43 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझे दुर्दैव आहे आणि असे अनेकांच्या बाबतीत घडते, असे मी म्हणालो होतो; परंतु मला शिवसेना पक्षाने संधी दिली नाही असे विशेषकरून इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून सातत्याने दाखवले जात आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. आपण तसे विधान केले असल्यास ते प्रसिद्ध करावे, असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच
तलाठी मूळ वारसदाराला डावलून तोतया वारसदाराचे नाव सातबारावर वारसदार म्हणून दाखल करतो तसे शिवसेनेचे झाले. विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग यांनी तशाच प्रकारे शिवसेना, निशाणी, झेंडा हा तोतया वारसदाराचा असल्याचे ठरवले. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार उद्धव ठाकरे हेच आहेत.
मी नौटंकीबाज नाही
विरोधी पक्षनेतेपद मिळण्याकरिता मी नाराजीचे नाटक करतो आहे असे टीव्ही वाहिन्यांवर दाखवणे म्हणजे माझ्या 43 वर्षांच्या तत्त्वाने लढणाऱ्या राजकीय सिद्धांतावर प्रचंड अन्याय करणारे आहे, या बातमीने माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या आहेत, असेही भास्कर जाधव म्हणाले. कोणतीही गोष्ट मिळवण्याकरिता नौटंकी, नाटकबाजी, रुसणे, रडत राहणे असे आपण उभ्या आयुष्यात केले नाही.