
रत्नागिरी जिह्यातील गुहागरच्या खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनीच महाविद्यालयाच्या चार प्राध्यापकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्राध्यापकांना मारहाण करणाऱया संस्थाचालकांवर त्वरित कारवाई करावी आणि संस्थेच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी आज केली
औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे भास्कर जाधव यांनी या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. रत्नागिरी जिह्यातील गुहागरमधील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांना संस्थाचालकांनीच गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयाचे प्राध्यापक गोविंद सानप, प्रा. संतोष जाधव व अन्य एक प्राध्यापक हे आले असता सकाळी 8.30 च्या सुमारास कॉलेजच्याच संकुलात हा प्रकार घडला. गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संस्थाचालक संदीप भोसले, मोहन भोसले व त्यांच्या सहकाऱयांनी तिन्ही प्राध्यापकांच्या गाडीसमोर आपली गाडी आडवी टाकली आणि त्यांना गाडीतून उतरायला सांगितले. तिघेही गाडीतून खाली उतरताच त्यांनी त्यांना लाठय़ाकाठय़ा, रॉडने मारायला सुरुवात केली. हे सुरू असताना संस्थेचे अध्यक्ष आले. त्यांच्यासमोर या तिघांना मारहाण करण्यात आली. कॉलेजच्या पोर्चमध्येही प्राचार्यांच्या प्राध्यापक नीळपंठ भालेराव यांच्यासह तिघांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी प्राध्यापकांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. पोलिसांवर कोणाचा दबाव होता हेदेखील समोर आले पाहिजे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
मुंबई विद्यापीठ अॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनने म्हटले आहे की, कॉलेजमध्ये चालणाऱया बेकायदेशीर बाबी हे प्राध्यापक उघड करीत आहेत, असा संशय घेऊन त्यांना ही मारहाण करण्यात आली. कॉलेजमध्ये चाललेल्या गैरप्रकाराबद्दल मुंबई विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केली आहे. तुम्हीच विद्यापीठाला निनावी पत्र पाठवून कळवले होते ना, अशी विचारण प्राध्यापकांना मारहाण करताना संस्थाचालक विचारत होते. ही बाब प्राध्यापक संघटनेने समोर आणली आहे. महाविद्यालयावर प्रशासक नियुक्तीची कारवाई तत्काळ करण्यात यावी तसेच प्राध्यापकांना मारहाण करणारे संस्थाचालक व त्यांच्या सोबतच्या व्यक्तींवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.