
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे शेफ एअर फ्लाईट किचन या कंपनीच्या कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांना आता मुंबई विमानतळावरील फिल्ड हँडलिंग युनिटमध्ये सामावून घेण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे. शेफ एअर फ्लाईट किचन या कंपनीच्या व्यवस्थापनाने ही कंपनी अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला असून येत्या 31 मार्चपासून त्यांना कंपनीच्या सेवेतून मुक्त केले जाणार आहे. भारतीय कामगार सेनेने हा विषय गंभीरतेने घेऊन व्यवस्थापनाला जाब विचारला आणि कर्मचाऱयांना अन्य कंपनीत सामावून घेण्यासाठी आग्रह धरला. परिणामी, कंपनीने कायम सेवेत असलेल्या कामगारांना सामावून घेण्यास होकार दिला.
नैमित्तिक कामगारांवर अन्याय करू नका
कंपनीतील अनेक कामगार गेल्या 10 ते 15 वर्षांहून अधिक काळ सेवेत आहेत. आश्चर्य म्हणजे हे कंत्राटी कामगार नाहीत तर नैमित्तिक कामगार (कॅज्युअल लेबर) आहेत. असे असूनही ते इतकी वर्षे अखंडित सेवा करीत आहेत. हे खरे तर कायद्याच्या विरोधी आहे. ही कंपनी केंद्र सरकारच्या हॉटेल कॉर्पोरेशनची उप कंपनी आहे. त्यामुळे या कामगारांना सुरक्षा प्रदान करा, त्यांनाही कायम सेवेत असलेल्या कामगारांप्रमाणे अन्यत्र सामावून घ्या, अशा मागणीचे निवेदन आज भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांना दिले.