देशाबाहेर पळालेल्या गुन्हेगारांना शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भारतपोल नावाचे पोर्टल लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून इंटरपोलसारख्या आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून जलद मदत घेऊन वेगाने तपास करता येणार आहे. तपास यंत्रणांनी फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची वेळ आल्याचे मतही शहा यांनी यावेळी व्यक्त केले.
दिल्ली येथील भारत मंडपम येथे भारतपोल हे पोर्टल लाँच करण्यात आले. रिअल टाइम इंटरफेस हे सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने विकसित केलेल्या पोर्टलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. केंद्र आणि राज्यातील यंत्रणांना इंटरपोलसारख्या तपास यंत्रणांची सहज आणि जलद गतीने संपर्क साधता येईल. यामुळे त्यांच्या तपासाला गती मिळेल असे शहा म्हणाले. गुन्हा करून फरार झालेल्यांना पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्राचा वापर करण्याची वेळ आल्याचे अमित शहा म्हणाले.
भारतपोल पोर्टल काय आहे?
सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गुह्यांचा तपास जलद आणि रियल टाइम किंवा वेळेत आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून मदत मिळण्याची गरज आहे. त्यामुळे सीबीआयने भारतपोल पोर्टल विकसित केले आहे.
या पोर्टलमुळे केंद्र आणि राज्यातील तपास यंत्रणांना इंटरपोलच्या 195 सदस्य राष्ट्रांसोबत प्रकरणांची माहिती शेअर करता येईल तसेच याच्या मदतीने इतर देशांतून आवश्यक ती माहिती जलद गतीने मिळवता येईल. मोदी सरकारने गेल्या वर्षी तीन नवीन फौजदारी कायदे लागू केले आहेत. त्यांच्या मदतीने फरार गुन्हेगारांवर खटला चालवता येईल.