
नुकतेच संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना एक विधान केले होते. त्या वक्तव्यावर टीका करताना कर्नाटकचे भाजप आमदार भरत शेट्टी यांची जीभ घसरली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींना संसदेत बंद करून कानशिलात लगावली पाहिजे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, मंगळूर शहर उत्तरचे आमदार भरत शेट्टी म्हणाले, ‘विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत बंद करून कानशिलात लगावली पाहिजे. असे केल्याने सात ते आठ एफआयआर नोंदवले जातील. जर राहुल गांधी मंगळुरू शहरात आले तर आम्ही त्यांच्यासाठीही अशीच व्यवस्था करू’, असे वक्तव्य केले आहे.
भरत शेट्टी राहुल गांधी यांच्यावर आरोप करताना म्हणाले, ‘वेड्या माणसाला हे माहीत नाही की भगवान शिवाने तिसरा डोळा उघडला तर तो राख होऊन जाईल. त्याने हिंदुविरोधी धोरण स्वीकारले आहे. हे स्पष्ट आहे की,राहुल गांधी एक वेडा माणूस आहे. त्याला वाटतं की तो हिंदूंबद्दल काहीही बोलतो, तो संसदेत बोलला तर स्थानिक नेते शेपूट हलवू लागतील’.