रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोसमधून पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. आता याच जिल्ह्यातील मिंधेंच्या मंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे महायुतीतली धुसफूस वाढत असल्याचे चित्र आहे.
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. पुढच्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विभागांसोबत बैठका सुरू केल्या आहेत. तसेच जिल्हाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतही या बैठका सुरू आहेत. सोमवारी अजित पवारांनी विभागनिहाय बैठका घेतल्या, त्यात नाशिक आणि कोकण विभागाचा समावेश होता. पण या विभागाचे मंत्री अनुपस्थित राहिल्याने या बैठका होऊ शकल्या नाहीत.
अजित पवारांनी मंगळावारी घेतलेल्या बैठकीला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या हजर होत्या. पण त्याच जिल्ह्यातले मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले हे या बैठकीला गैरहजर होते. रायगडावर शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे 40 ते 50 हजार धारकऱ्यांसोबत आले होते. त्यामुळे या बैठकीला आपल्याला यायला जमणार नव्हते, अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना दिली होती, असेही गोगावले म्हणाले.
दुसरीकडे मिंधे गटाचे आणखी एक मंत्री दादा भुसे यांनीही बैठकीला दांडी मारली. नाशिकमध्ये आपली ठरलेली कामं होती, त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहता आले नाही असे भुसे म्हणाले.
रायगडचे पालकमंत्रीपद हे अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्याकडे तर नाशिकचे पालकमंत्रीपद हे भाजप नेते गिरीष महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. पण या निर्णयामुळे भाजप आणि मिंधे गटाचे संबंध ताणले गेले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दावोसमधून या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली होती. पालकमंत्रीपदाबाबत विचारल्यावर हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.