भांडुप येथील महानगरपालिकेच्या सुषमा स्वराज प्रसूतिगृहात सिझेरीयन शस्त्रक्रियेवेळी आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची नव्याने चौकशी केली जाणार आहे. शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
29 एप्रिल 2024 रोजी ही घटना घडली होती. सैदूनिसार अन्सारी हिच्या प्रसूतीसाठी सिझेरियन शस्त्रक्रिया सुरू असतानाच प्रसूतिगृहाची वीज खंडित झाली होती. जनरेटरही बंद होता. डॉक्टरांनी बॅटरीच्या उजेडात शस्त्रक्रिया केली. त्यात बाळाचा मृत्यू झाला. सैदूनिसार हिचाही अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला. चौकशी समितीने प्राथमिक अहवालात ही माहिती दिली होती. परंतु शस्त्रक्रिया करणाऱया दोन्ही डॉक्टरांची चूक समितीने काढलेली नाही किंवा कोणावरही ठपका ठेवला नाही. मग या मृत्यूंना जबाबदार कोण, असा सवाल आमदार कोरगावकर यांनी यावेळी उपस्थित केला.
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे असुविधांमुळे मृत्यू होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या घटनेची पुन्हा चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार कोरगावकर यांनी केली. भांडुपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहही दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्याचप्रमाणे भांडुपमधील प्रसूतिगृहांसाठी आलेले इन्क्युबेटर्स चेंबूरच्या रुग्णालयाला देण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
z सुषमा स्वराज प्रसूतिगृहातील घटनेप्रकरणी दुय्यम अभियंता प्रतिभा नितीन माळी यांची खात्यांतर्गत चौकशी केली जात असून डॉ. संन्याल कदम यांचेही नूतनीकरण करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले. भांडुपमधील प्रसूतिगृहांसाठी आलेली इन्क्युबेटर्स स्थानिक आमदारांच्या मागणीप्रमाणे भांडुपमध्येच दिले जातील, असे सामंत यांनी सांगितले. राज्यात वीजपुरवठय़ाची सोय नसलेल्या सर्व प्रसूतिगृहांचा आढावा घेण्याच्या सूचना आरोग्य आयुक्तांना देण्यात येतील, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी या लक्षवेधीला उत्तर देताना दिले.