भंडारा: शाळेला पालकांनीच ठोकलं टाळं, केली शिक्षकांची मागणी

>> सूरज बागड, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील धोप या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पालकांनी चक्क शाळेला टाळे ठोकले आहे. शिक्षकांची कमतरता असल्यामुळे शाळेला नियमित शिक्षक देण्यात यावे या मागणीसाठी पालकांनी आक्रमक होत टोकाची भूमिका घेतली आहे.

शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत पदाधिकारी, पालक वर्ग, विद्यार्थी व ग्रामवाशियांच्या समक्ष शाळेला कुलप ठोकून आंदोलन सुरू केले आहे. शाळेत एकूण 7 वर्ग असून फक्त 3 शिक्षक असल्याने विद्यार्थांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळेला आणखी 3 शिक्षकाची मागणी करत ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी आम्ही लढा लढतो शिक्षणासाठी’, असा नारा देत पालकांनी आंदोलन केले आहे.