Bhandara News : विजेचे दर त्वरित कमी करा, शेतीला दिवसा वीज पुरवठा करा! शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

भंडारा जिल्ह्यातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. अशातच वाढीव बील येत असल्यामुळे नागरिकांसहीत शेतकऱ्यांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड पडत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. रात्रीचे वेळी शेतीच्या कामांसाठी वीज पुरवठा देण्यात येत आहे. त्यामुळे शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

भंडारा जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीज प्रति युनिट दर व इतर दरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त असलेली जनता वाढीव वीज बील येत असल्यामुळे होरपळून निघत आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कृषी पंपांना रात्रीचा वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रात्री होणारा वीज पुरवठा बंद करून दिवसा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने महावितरण कंपनीने वाढवलेले वीजेचे दर त्वरित कमी करावे, जिल्ह्यातील कृषीपंपांना होणारा वीज पुरवठा दिवसा करून सामान्य जनतेला आणि शेतकरी बांधवांना न्याय द्यावा, असा मागण्या केल्या आहेत. तसेच या मागण्या मान्य झाल्या नाही, तर शिवसेना महावितरण कंपनीने चालवलेल्या हुकुमशाही विरोधात तिव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.