भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याविषयी वारंवार तक्रारी करूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळेच नगरपरिषदेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांच्या माध्यमातून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांना दिले आहे.
तुमसर शहरामध्ये पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नळाला पाणी आले नाही, तर नागरिकांची पाण्यावाचून मोठी गैरसोय होते. दिवसाआड एक तास पाणी द्या, परंतु ते पूर्ण दाबाने मिळायला हवे. शिवाय पाण्याची वेळ निश्चित असणे गरजेचे आहे. अशी मगाणी नागरिकांनी केली आहे. सध्या कमी दाबाने व अवेळी पाणी मिळत असल्याने सर्व कामे सोडून पाणी सुटण्याची वाट पहावी लागते. नियमीत पाणीपट्टी भरूनही पुरेसे पाणी मिळत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे शहरातील विविध भागात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
तुमसर नगरपरिषद लोकसंख्येने मोठी आहे. नगरपरिषदेला स्वच्छता अभियानांतर्गत नावलौकिक मिळाला, परंतु काही दिवसांपासून शहरातील हनुमान नगर, गांधी नगर व रविदास नगर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करण्याबाबत नगरपरिषदेचे नियोजन ढासळले आहे. नियमित पाणीपुरवठा वेळेत होत नाही. याबाबत गांभीर्याने विचार करून तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आला. तसेच यावेळी नागरिकांनी नगर परिषदेला घेराव घातला.