Bhandara: बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेत कारखान्यातील रसायनयुक्त पाणी; शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

>> सूरज बागडे, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी सुकळी शिवारामधील बावनथडी प्रकल्पाच्या वितरिकेत औषधनिर्मिती कारखान्यातील रसायनयुक्त विषारी पाणी सोडले जात आहे. वितरिकेतून बावनथडी प्रकल्पातील पाणी शेती सिंचनाकरिता सोडण्यात येते. या रसायनयुक्त पाण्यामुळे शेती नापीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी संदीप वाट यांनी बावनथडी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, देव्हाडी व सुकळी शिवारात बावनथडी प्रकल्पाची वितरिका आहे, या वितरिकेत देव्हाडी येथील क्लेरियन ड्रग्ज कंपनीचे रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा रंग काळा व पिवळसर तपकिरी आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून, या वितरिकेचे पाणी शेतकरी सिंचनाकरिता शेतात घेतात. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेती नापीक होण्याच्या धोका वाढलेला आहे. या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन संबंधित कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे.