असह्य उकाडा आणि भाजून काढणाऱया उन्हात भजन कौरच्या यशाने हिंदुस्थानींना गारवा दिला. तिरंदाजीत अपयशाची मालिका कायम असताना भजन कौरने अचूक निशाणा साधत महिलांच्या वैयक्तिक तिरंदाजीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता ती पदकापासून केवळ एक विजय दूर आहे.
सोमवारी पुरुष आणि महिला तिरंदाजांना सांघिक प्रकारात पात्रता फेरीतच बाद व्हावे लागल्याने घोर निराशा झाली होती. तरीही आज हिंदुस्थानचे तिरंदाज अचूक बाण मारतील या अपेक्षेने शेकडोंच्या संख्येने चाहते पॅरिसच्या चोहोबाजूंनी खुल्या असलेल्या तिरंदाजी स्टेडियम्समध्ये पोहोचले होते. अंकिता भकतने पहिला सेट गमावल्यानंतर पुढचे दोन्ही 29-26, 28-27 असे जिंपून आघाडी घेतली होती, मात्र चौथ्या सेटमध्ये पोलंडच्या वायलेटा मिसझोरने29-27, 29-28 असे दोन्ही सेट जिंकले आणि 6-4 ने सामना खिशात घातला. या अपयशी कामगिरीनंतर सर्वांचे लक्ष भजन कौरवर लागले होते. इंडोनेशियाच्या सैफिया कमालविरुद्धच्या लढतीचा पहिला सेट पिछाडीवर पडलेल्या भजन कौरने आपला तिसरा बाण परफेक्ट टेन मारत 27-27 असा बरोबरीत सोडवला. मग दुसऱया सेटमध्ये कमालने आपली कमाल दाखवत 9,10,10 असे गुण मिळवले तर भजनने तिन्ही बाणांवर प्रत्येकी 9 गुण मिळवल्यामुळे कमालने बाजी मारली. पण तिसऱया सेटमध्ये भजनने आपली कमाल दाखवताना दोन परफेक्ट 10 मारले आणि आपले आव्हान जिवंत ठेवले. या सेटच्या विजयामुळे उत्तेजित झालेल्या भजनने पुढील दोन्ही सेटमध्ये कमालपेक्षा सरस कामगिरी केली आणि बाजी मारली. तिने 7-3 असा विजय नोंदवित उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.