माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. भगवतसिंग ओम सिंग असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने अटक आरोपींची संख्या दहा झाली होती. शस्त्रे आणून देण्यासाठी त्याने मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
बाबा सिद्दिकी यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती. निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवला होता. पोलिसांनी तपास करून गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर, हरीश कुमार निशाद, नितीन सप्रे, संभाजी पारबी, राम कनोजिया, प्रदीप ठोंबरे, आणि चेतन पारधीला अटक केली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तुले, तीस जिवंत काडतुसे, तीन मॅगझीन, पाच मोबाईल, दोन आधारकार्ड आदी मुद्देमाल जप्त केला होता. अटक आरोपींच्या चौकशीत भगवतसिंग याचे नाव समोर आले होते. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण थोरात, पोलीस निरीक्षक मंगेश देसाई आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी नवी मुंबई येथील भंगारविव्रेत्याची माहिती काढली. पोलिसांना भगवतची माहिती मिळाली. भंगारविव्रेता भगवतला रद्दी आणि भंगार खरेदी करणार का, अशी पोलिसांनी विचारणा केली. खरेदीसाठी होकार दिल्यावर पोलीस साध्या वेशात बेलापूर पोलीस कॉलनीच्या प्लॉट क्रमांक 1 येथे गेले. तेथून पोलिसांनी भगवतसिंगला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.
मे महिन्यात गेला होता उदयपूरला
भगवतसिंग हा पूर्वी वांद्रे येथे राहत होता. तो एका फरार आरोपीच्या माध्यमातून राम कनोजियाच्या संपका&त आला. कनोजियाने उदयपूर येथून ती शस्त्रे घेतली होती. उदयपूर येथून ती शस्त्रे गाडीने आणायची होती. त्यासाठी भगवत हा मे महिन्यात उदयपूरला गेला होता. तेथे तो एका हॉटेलमध्येदेखील राहिला होता.
कामाचे दिले आमिष
उदयपूर येथून शस्त्रे गाडीने आणण्याच्या कामात भगवतला काही आमिषे दिली गेली होती. शस्त्रे पोलिसांनी न पकडता आणल्यास त्याला आणखी काही कामे मिळणार होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. शस्त्रे आणण्याच्या कामाच्या मोबदल्यात त्याला काही पैसेदेखील मिळाले होते.