चांगलं काम करणाऱ्या मंत्र्यांना भाजपनं तुरुंगात टाकलं; भगवंत मान यांचा निशाणा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करणाऱ्या आम आदमी पार्टी (आप) नेत्यांना तुरुंगात टाकल्याचा आरोप केला.

मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी मंत्री जैन यांच्या अटकेचा निषेध केला आणि या नेत्यांच्या अटका या केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.

‘शिक्षण व्यवस्था सुधारली, तेव्हा मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकलं, आरोग्य सेवा सुधारली तेव्हा सतेंदर जैन यांना तुरुंगात टाकलं, देशाचं समर्थन अरविंद केजरीवाल यांना मिळत असल्याचं दिसलं तेव्हा त्यांनाही भाजप सरकारनं अटक करून तुरुंगात टाकलं. असं मान यांनी सोमवारी जाहीर सभेत सांगितलं.

मान यांनी जनतेला स्वयंपाकाच्या गॅससाठी नुकत्याच करण्यात आलेल्या 100 रुपयांच्या किरकोळ सवलतींमुळे भारावून न जाण्याचं आवाहन केलं आणि तसंच हरियाणा आणि संपूर्ण देशात व्यापक राजकीय बदल घडवून आणण्याचं आवाहन केलं.

‘मोदीजी जवळपास चार वर्षे लुटतात आणि शेवटी एलपीजी सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करून जनतेला लॉलीपॉप देतात’, असं मान म्हणाले.

हरियाणातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मतदारांना अशा लॉलीपॉपच्या आहारी न जाण्याचं आवाहन केलं.