पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान हे मंगळवारी गुजरातमध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या प्राचारासाठी आले होते. प्रचारादरम्यान ते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. प्रचारावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे सध्या कथित मद्य धोरण परवाना घोटाळा प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत त्यांच्याबद्दल बोलत होते. यावेळी बोलता-बोलता मुख्यमंत्री मान हे भावूक झाले. ‘जेल के ताले टूटेंगे, केजरीवाल छूटेंगे’, अशा घोषणा त्यांनी दिल्या.
गुजरातमधील भावनगर मतदारसंघातून AAP चे उमेदवार उमेश मकवाना हे निवडणूक लढत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे त्यांच्या प्राचारासाठी आले होते. ‘मी अरविंद केजरीवाल यांचा सच्चा सैनिक आहे. उमेश मकवाना हे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. आजपासून गुजरातमध्ये क्रांतीला सुरुवात झाली आहे. ज्यांचे हृदयावर अधिराज्य आहे, तेच फक्त राज्य करू शकतात… अन्यथा कोंबड्याच्या डोक्यावरही तुरा असतो. आताची लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची आहे. केजरीवाल यांना तुम्ही तुरुंगात टाकाल. पण त्यांचे विचार कसे रोखाल?’, असं म्हणत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
मी दहशतवादी नाही…माझे नाव अरविंद केजरीवाल आहे; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा तुरुंगातून जनतेला संदेश
‘केजरीवाल यांना दहशतवाद्यासारखी वागणूक’
‘माझा इथे येण्याचा मान सन्मान ठेवा. 4 तारखेला निकालावेळी भावनगरमध्ये ‘आप’चा झाडू आघाडीवर पाहिजे. ‘इंडिया’ आघाडीकडून आपण दिल्ली आणि गुजरातमध्ये लढतोय. आपल्याला हिंदुस्थान वाचवायचा आहे. अरविंद केजरीवाल यांना भेटून आलोय. त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. 14 टक्के मतं दिल्याने AAP ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, असे केजरीवाल म्हणाले. अरविंद केजरीवाल यांना भेटलो त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू आले. केजरीवाल यांना दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जात आहे. यामुळे आता आपल्या सगळ्यांना केजरीवाल व्हायचं आहे’, असं आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुजरातच्या जनतेला केलं.
अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीतच