
>> भगवान हारूगडे
प्राचीन काळात समाज प्रबोधन करण्यासाठी लोककलांचा वापर करण्यात आला. मात्र सध्याच्या डिजिटल युगात करमणुकीची अनेक साधने सहज उपलब्ध असल्यामुळे लोककला लोप पावत चालली. त्यामुळे लोककलाकारही उपेक्षितच राहिले. लोककला टिकण्यासाठी आधी कलाकार टिकले पाहिजेत. त्यांच्या कलेचा सन्मान झाला पाहिजे. याचसाठी खोपोली येथील जांभुळपाडय़ाच्या निसर्गरम्य परिसरात `टेंडर रूटस्’ने लोककलेच्या संवर्धनाचे व्रत हाती घेतले आहे.
लोककला लोकांच्या जीवनाला रंग, आनंद आणि समृद्धी प्रदान करतेच. पण समाजातील विविध जात, धर्म आणि समुदायांमध्ये एकता निर्माण करण्याचे कार्यही करते. कलेच्या माध्यमातून भारताच्या विविध भागांतील लोक एकमेकांशी जोडले जातात. ही कला विविध प्रादेशिक, भाषिक व सांस्कृतिक वैशिष्टय़ांनी भरलेली आहे. दुर्दैवाने अलीकडच्या काळात या ग्रामीण लोककलांचा, पर्यायाने लोककलाकारांचा झपाट्याने ऱ्हास होतो आहे.
भारतीय लोककलांचा हा वारसा जिवंत ठेवण्यासाठी आणि संगीत देशाच्या कानाकोपऱयात पसरविण्यासाठी मुंबई येथील `टेंडर रूटस्’ अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस् सातत्याने प्रयत्नशील आहे. महेश बाबू यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही `टेंडर रूटस्’ अकॅडमी 2014 पासून लोककलेच्या समृद्ध वारशाचे जतन, संगोपन, प्रचार आणि प्रसार करत आहे. संस्थेतर्फे ना-नफा तत्त्वावर पदरमोड करून विद्यार्थ्यांना भारतासह जगभरातील परफॉर्मिंग आर्टस्ची माहिती आणि शिक्षण देण्यात येत आहे.
लोककला पुनरुज्जीवित करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी महेश बाबू यांनी खोपोली येथील जांभुळपाडा येथे निसर्गरम्य आठ एकर जागेवर एक इन्स्टिटय़ूट उभे केले आहे. आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना आपल्या लोककलांची माहिती व्हावी आणि त्या मुलांत लपलेल्या कलाकारांचा शोध घेण्यासाठी त्यांनी अलीकडेच `टेंडर रूटस्’तर्फे एक कार्यक्रम आयोजित केला होता. आदिवासी आणि ग्रामीण भागातील सुमारे 800 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. यावेळी सांगली, नाशिक, राजस्थान येथील कलाकारांनी या मुलांसमोर आपली कला सादर केली. शहरी सोयी-सुविधांपासून दूर असलेली ग्रामीण-आदिवासी भागातील मुले हे सर्व पाहून भारावून गेली होती. त्यांच्यासाठी या लोककला म्हणजे जणू एक उत्सवच होता. पहिल्यांदाच असे काही पाहिल्याने या मुलांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता.
अनोख्या पद्धतीने यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विविध शाळांतील मुलांना दोन दिवस अकॅडमीने स्वखर्चाने लोककलांचे दर्शन घडविले. `टेंडर रूटस्’तर्फे आजपर्यंत मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, वाराणसी, दिल्ली, डेहराडून, बंगळुरू येथील 80 शाळांतील 15 हजार मुलांना लोककलांचे दर्शन घडविण्यात आले आहे. आपल्या देशातील कलाकारांबरोबरच साऊथ आफ्रिका, रशिया, टर्की, स्कॉटलंड येथील कलाकारांची अदाकारीही भारतीयांना घडविण्यात आली आहे.
शक्यतो शाळेच्या परिसरातच असे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांत विद्यार्थ्यांना कलाकारांशी संवाद साधण्याची आणि संगीत शिकण्याची संधी मिळते. संगीत, नृत्य व लोककला यासारख्या कला विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या जातात. तसेच भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि लोककलाकार व आंतरराष्ट्रीय कलाकारांचा सन्मान केला जातो. या महोत्सवांमध्ये रूट फोकवेज – चिल्ड्रन्स फेस्टिव्हल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, जॅझ फॉर किड्स, चिल्ड्रन्स वर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हल यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (मुंबई), संस्कृती केंद्र (दिल्ली) आणि बंगळुरू आंतरराष्ट्रीय केंद्र (बंगळुरू) यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम पार पडतात.
अकॅडमीतर्फे तरुण संगीतकार आणि कलाकारांचा शोध घेऊन त्यांच्या कलेचा सन्मान करण्यात येतो. तसेच लोककलेचे उपासक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱया गुरूंच्या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी प्रयत्न केला जातो. कलाकारांमधील प्रतिभेचा सतत शोध घेऊन पात्र कलाकारांना `टेंडर रूटस्’च्या विविध व्यासपीठांवर कला सादर करण्याची संधी दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास मिळतो. म्हणूनच शाळा व विद्यार्थ्यांनाही टेंडर रूट्समध्ये सामील करून घेतले जाते. सांगलीचा अमोघ अंबी हा 10 वर्षांचा बालशाहीरही अशाच एका कार्यक्रमातून उदयास आला. बालवयातील त्याच्या पहाडी आवाजाने दिल्ली, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध कॅम्प गाजवले.
लोककला जिवंत ठेवण्यासाठी आधी लोककलाकार जगले पाहिजेत, याची जाण असल्यामुळेच संस्थापक महेश बाबू आणि संचालिका नंदिनी महेश यांनी 2020 मध्ये कोविड काळात लोककलाकारांच्या उदरनिर्वाहासाठी अनेक उपक्रम पार पाडले. त्या काळात आलेल्या निर्बंधांमुळे कलाकारांचा उदरनिर्वाह थांबला होता. `टेंडर रूटस्’कडून अशा कलाकारांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. `टेंडर रूटस्’ आणि `बनियन ट्री’ यांच्या माध्यमातून संस्कृती, कला यांच्या उन्नतीसाठी हे महत्त्वपूर्ण काम केले जाते. संवर्धनावर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही लोककला जोपासली जाते. वासुदेव, मुरळी, गोंधळी, भारूड असे अनेक लोकसंस्कृतीचे उपासक ठिकठिकाणी आढळतात. कीर्तन, दशावतार, लावणी, पोवाडे, डोंबाऱयाचे खेळ, कलगीतुरा यांचा लोककलांत समावेश होतो. पहाटेच्या प्रसन्न वेळी रामकृष्णाच्या नावाचे उच्चारण करीत वासुदेव दारात येतो. महाराष्ट्राच्या कुळाचारात ज्यांची प्रामुख्याने आठवण केली जाते ते म्हणजे गोंधळी. लोककला आणि लोकसंस्कृती ही विविध महोत्सवांपुरतीच मर्यादित न राहता तिचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. केवळ याच उद्देशाने खोपोली येथील जांभुळपाड्याच्या निसर्गरम्य परिसरात लोककलेच्या संवर्धनाचे `टेंडर रूटस्’ने हाती घेतलेले व्रत वाखाणण्याजोगे आहे.