गीताबोध – `योग कर्मसु कौशलम्।’

>> गुरुनाथ तेंडुलकर

कोणतेही काम करताना केवळ त्यातून ‘आपल्याला काय मिळणार आहे?’ अशा फलाकडे नजर ठेवून काम करणाऱयाला त्या कामातील नेमका आनंद मिळत नाही. त्या कामातून अपेक्षा केलेले फल जर मिळाले नाही तर अपेक्षाभंग होतो आणि अपेक्षाभंगातून माणसाला दुःख होते. अनेकदा त्याचा विपरित परिणाम मन:स्थितीवर होतो. सामान्य नैराश्यापासून (डिप्रेशन) ते अगदी मानसिक संतुलन ढासळण्यापर्यंत आणि वेड लागण्यापर्यंतही अनेक प्रकारचे विकार उद्भवू शकतात. परंतु कामाला योग मानून कुशलतापूर्वक कर्म करणाऱयाला कामाचे फल तर मिळतेच, पण त्याचबरोबर इतरही अनेक प्रकारचे लाभ होतात. त्यातील एक महत्त्वाचा लाभ म्हणजे आनंद. काम व्यवस्थित केल्याचा आनंद. आपण आपले पूर्ण प्रयत्न कामी लावून काम केले याचे समाधान. अशा प्रकारे निर्मोही वृत्तीने तरीही कुशलतापूर्वक काम करणे म्हणजे योग.

आपल्यापैकी अनेकजण प्रवास करतात. त्या प्रवास करण्यामागे अनेकदा आपला मुख्य उद्देश या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणे एवढाच मर्यादित असतो, परंतु जर तो प्रवास नीट डोळसपणे आणि सजग राहून केला तर त्यातून एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पोहोचण्याबरोबरीनेच प्रवासाचाही आनंद मिळू शकतो. नवीन ओळखी होऊ शकतात. नवीन अनुभवाला सामोरे जाता येते. नवीन प्रदेश, तिथले वातावरण, चालीरीती, वाटेतील सौंदर्यस्थळे एक ना अनेक अनुभव मिळू शकतात. आयुष्य अधिकाधिक समृद्ध होऊ शकते.

जी गोष्ट प्रवासाची तीच गोष्ट अभ्यासाची. केवळ परीक्षेसाठीच आणि परीक्षेपुरताच थातूरमातूर अभ्यास करण्यापेक्षा थोडे अवांतर वाचन केले तर? केवळ पेपरमध्ये येऊ शकणाऱया अपेक्षित प्रश्नांची उत्तरे घोकून पेपरवर लिहिण्यापेक्षा थोडे गाईड्स आणि अपेक्षित उत्तरांच्या बाहेर जाऊन क्रमिक पुस्तकं (टेक्स्ट बुक) नीट वाचली तर? त्यानंतर त्या क्रमिक पुस्तकांच्याही बाहेर जाऊन थोडं त्या विषयाचं अवांतर वाचन केलं तर? तज्ञ शिक्षकांशी किंवा सहअध्यायी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यातून थोडं अधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तर? आपल्याला जे समजलं ते इतरांना समजावून सांगितलं तर… तर मला वाटतं मार्कांपेक्षा अधिक काहीतरी लाभ होईल. तो लाभ कदाचित आयुष्यभरासाठीदेखील टिकेल.

भगवान श्रीकृष्ण हाच मुद्दा पुढे मांडताना म्हणताहेत,
कर्मंजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण।
जन्मबन्ध निनिर्मुक्ताः पदं गच्छन्ति अनामयम।। 51।।
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतिररिष्यति।
तदा गन्तसि विर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च।। 52।।
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला।
समाधावचला बुद्धिस्तदा योगम् अवाप्स्यसि।। 53।।

भावार्थ – असे बुद्धियोगी आणि मनाचे स्वामी (मन ताब्यात असलेले) पुरुष आपल्या कर्माच्या फलाची आसक्ती न धरल्यामुळे जन्म आणि कर्मबंधनातून मुक्त होऊन दुःख रहित पदाला जातात.

हे अर्जुना, ज्या वेळी तुझी बुद्धी मोहाने गढूळ झालेल्या आवरणातून बाहेर येईल त्या वेळीच तू आजवर ऐकलेल्या पाप-पुण्य, इष्ट-अनिष्ट इत्यादी लोकमतांच्या गोष्टींना कंटाळून त्यातून मुक्त होशील. वेदांतील किंवा आजवरच्या रूढीपरंपरेतील धर्माचरणामुळे तसंच कर्म-अकर्म काय, योग्य-अयोग्य काय हे लोकांनी आणि समाजाने तुझ्या मनावर बिंबवलं आहे. त्याने चंचल झालेली तुझी बुद्धी जेव्हा स्थिर आणि निश्चल होईल त्याच वेळी तुला बुद्धियोग प्राप्त होईल.

इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, आपण आपली मतं ही स्वतच्या विचारांवर न ठरवता बाहेरच्या अनेक गोष्टींवर बनवत असतो. त्यानुसारच आपली वर्तणूक घडत असते. आपल्याला वाटत असतं की, आपण आपल्या मनाने निर्णय घेतले. परंतु हे निर्णय आपण आपल्या मनानुसार घेतलेलेच नसतात. आपल्या मनावर लहानपणापासून बिंबवलेली माहिती, घरी आणि शाळेत झालेले संस्कार, आजूबाजूचं वातावरण, समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ लोकांची मतं, अलीकडच्या काळात तर सोशल मीडिया आणि समाजातील काही मूठभर स्वार्थी लोकांनी केलेले प्रचार-अपप्रचार यांच्यामुळे आपले निर्णय ठरत असतात. आपल्याला वाटतं की, आपण फार विचारपूर्वक निर्णय घेतोय. परंतु तसं होत नाही. आपले बहुतेक निर्णय हे बुद्धीतून न जन्मता केवळ भावनेतून जन्मतात. स्थिर बुद्धीने घेतलेले निर्णय फार वेगळे असतात. ते वरकरणी जरी मनाला पटत नसले तरी त्यांचे दीर्घकालीन परिणाम योग्यच ठरतात.

महाभारतातील एक आख्यायिका आहे की, दुर्योधनाचा जन्म झाला त्या वेळी अनेक अशुभकारक घटना घडल्या होत्या. गोठय़ातील गायीगुरं अचानक हंबरडा फोडू लागली. रानावनातील कोल्हे-कुत्री भेसूर सूरात रडू लागली. हत्तीशाळेतील हत्ती साखळदंड तोडण्यासाठी धडपडू लागले. अचानक जोराचा वारा सुटून झाडावर निजलेले पक्षी रात्रीच्या प्रहरी ओरडत सैरावैरा उडू लागले. त्या वेळी भीष्माचार्यांनी राजज्योतिषांना विचारून नवजात बालकाची कुंडली मांडली. राजज्योतिषांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, “हा बालक मानव वंशात जन्मला तरी तो मूळचा राक्षस कुलातील आहे. हा पूर्वजन्मीचा काली नावाचा असूर होता. त्याने भगवान शिवशंकरांची आराधना करून पुढील जन्मी आपला देह वज्रासम व्हावा असा वर मागून घेतला, परंतु माता पार्वतीने दिलेल्या शापामुळे त्याच्या कंबरेखालील भाग मात्र वज्र देही झाला नाही. तोच हा असूर आता या बालकाच्या रूपाने जन्माला आला आहे. तरी त्याचा आपण त्याग करावा अन्यथा हा संपूर्ण कौरवकुलाला धोका ठरेल.”

भीष्माचार्यांनीदेखील धृतराष्ट्राला परोपरीने समजावलं. वेद-उपनिषदांतील अनेक दाखले देऊन सांगितलं की,

त्यजेत एकं कुलस्यार्थे। गामस्यार्थे कुलं त्यजेत।।
गामं जनपदस्यार्थे। आत्मार्थे पृथ्विवीं त्यजेत।।

अर्थ – संपूर्ण कुलाला वाचवण्यासाठी एका सदस्याचा त्याग करावा. संपूर्ण गावाला वाचवण्यासाठी एका कुलाचा त्याग करायला हरकत नाही. संपूर्ण देशाचा विचार करताना एका गावाचा त्याग करणं इष्ट असतं, तर आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण पृथ्वीचाही त्याग करावा. हे वचन भीष्माचार्यांनी धृतराष्ट्राला पुन: पुन्हा समजावलं आणि दुर्योधनाला जंगलात सोडून देण्यासाठी सुचवलं. परंतु धृतराष्ट्रातील बापाने त्याच्यातील राजावर मात केली आणि त्याने दुर्योधनाचा त्याग करायला ठाम नकार दिला. पुढे काय झालं हे आपल्याला ठाऊक आहेच. आपला आतला आवाज काय सांगतो हे नीट ऐकावं. केवळ बाह्य जगातील संस्कारांमुळे, लोक काय म्हणतील, हे केल्याने पाप लागेल की पुण्य मिळेल… याकडे लक्ष न देता केवळ आपलं कार्य बुद्धी स्थिर ठेवून निरपेक्षपणे करीत रहावं. असं कार्य करणाऱयालाच सुखदुःखाच्या पलीकडे असणारा शाश्वत आनंद प्राप्त होतो.

[email protected]