केंद्रीय मंत्र्यांच्या घरात गोळीबार; दोन भावांमधील वादातून एकाचा मृत्यू, एक जखमी

केंद्रीय मंत्र्यांच्या घरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या भागालपूर परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेत केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्याला गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. नित्यानंद राय यांच्या दोन भाच्यांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादातून या दोघांनी एकमेकांवर गोळी चालवली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीत यादव आणि जयजीत यादव अशी या दोन भावांची नावे आहेत. हे दोघे नित्यानंद राय यांचे भाचे आहेत. विश्वजीत आणि जयजीत यांच्यात जमिनीवरून भांडण झालं. हे भांडण इतकं टोकाला गेलं की दोन्ही भावांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत विश्वजीतचा मृत्यू झाला तर जयजीत गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत नित्यानंद राय यांच्या बहिणीलाही गोळी लागली लागल्याने त्याही जखमी झाल्या आहेत. सध्या या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरू केली असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.