Bhadipa च्या ‘कांदे पोहे’ कार्यक्रमाला वादाची फोडणी; शो करावा लागला रद्द

कॉमेडियन समय रैना याचा ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ चांगलाच वादात सापडला आहे. या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. आई-वडिलांच्या शरीरसंबंधांवर केलेल्या घाणेरड्या विधानामुळे समय रैना, रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा आणि या शोच्या आयोजकांविरुद्ध पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’चा वाद सुरू असतानाच आता भाडिपाच्या ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’चा शो रद्द करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारीला हा शो होणार होता. मात्र हा शो रद्द करण्यात आला असून तिकीट बूक करणाऱ्यांचे पैसेही परत दिले जाणार आहेत, असे सारंग साठ्ये याने स्पष्ट केले.

‘इंडियाज गॉट लेटेन्ट’च्या वादानंतर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने भाडिपाला इशारा दिला होता. तिकीट आकारून कांदेपोही सारखे कार्यक्रम विनापरवानगी घेतले तर कारवाई केली जाईल, असे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले होते. त्यानंतर भाडिपाने ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ या शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. या शोमध्ये सई ताम्हणकरही उपस्थित राहणार होती.

रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल; घराला कुलूप, फोनही बंद

भाडिपाने काय म्हटले?

भाडिपाने आपल्या सोशल मिडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करत अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो रद्द झाल्याची माहिती दिली. भाडिपाच्या Fans ना कळवण्यात वाईट वाटत आहे की, सध्या ‘वातावरण तापल्यामुळे’ 14 फेब्रुवारीला होणारा अतिशय निर्ल्लज – कांदे पोहेचा शो आम्ही Postpone करत आहोत. तसंही Valentines Day ला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या Fans वर प्रेम आहे. आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. तिकिटांचा Refund 15 Working Days मध्ये तुमच्या Account वर जमा होईल. Refund ने स्वतःसाठी काहीतरी छान Gift घ्या. आम्हाला माहीत आहे की आमच्या Fans चंही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या Style ची कॉमेडी तुम्हाला आवडते. म्हणूनच आमचा Exclusive Content बघण्यासाठी खास YouTube Membership सुरु केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचे सर्व Videos 18+ वयासाठी Restrict केले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनलचा कंटेंट बघू शकता. अतिशय निर्लज्जपणे हा आमचा सभ्य Show लवकरच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला… पण तुमचा यंदाचाही Valentines Day घरीच बसून जाणार”, अशी पोस्ट भाडिपाने लिहिली आहे.