BGT 2024-25 – “देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे…”, रोहित-विराटच्या निवृत्ती संदर्भात गौतम गंभीर यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

बॉर्डर गावस्कर करंडकातील शेवटचा आणि दोन्ही संघांसाठी निर्णायक कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवला गेला. या सामन्यात कंगारूंनी टीम इंडियाचा 6 विकेटने पराभव केला आणि मालिका जिंकत WTC फायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले. हा पराभव टीम इंडियाच्या आणि चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर गावस्कर करंडक गमावण्याची नामुष्की टीम इंडियावर ओढावली. रोहित आणि विराटच्या कामगिरीवरही या मालिकेत बोट ठेवण्यात आले. यावरुन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण वक्तव्य करत देशांदर्गत क्रिकेट खेळण्याची गरज अधोरेखित केली.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने चार विकेट गमावत आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आणि सामना जिंकला. टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यामुळे त्याची कमतरता टीम इंडियाला भासली. सामना गमावल्यामुळे टीम इंडियाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या संपूर्ण मालिकेत अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची बॅट म्यानातून बाहेर न पडल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली.

खराब कामगिरीमुळे रोहित शर्मा पाचव्या कसोटीमध्ये मैदानात उतरला नाही. तसेच विराटची बॅट पहिल्या कसोटी सामन्यानंतर तळपली नाही. त्यामुळे त्याचा टीम इंडियाला फटका बसला. सिडनी कसोटी झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित आणि विराटच्या निवृत्ती संदर्भात भाष्य केले. ते म्हणाले की, “मी कोणत्याही खेळाडूच्या भविष्यावर भाष्य करू शकत नाही, तो त्यांचा निर्णय आहे. त्यांच्यामध्ये खेळण्याची भुक आणि क्षमता आहे. हिंदुस्थानी क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न ते करतील अशी मला आशा आहे. मला नेहमी वाटते की, देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही उपलब्ध असाल तर प्रत्येकाने खेळले पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला सिद्द करायचे असेल तर तुम्हाला देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे, असे गौतम गंभीर म्हणाले.