मोदी सरकारने वाजत गाजत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना आणली. महिलांना जास्तीत जास्त अधिकार द्यायला हवेत असे सांगताना मोदी थकत नाहीत; परंतु महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱया मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील महिला मंत्र्यालाच बेटी बचाओ, बेटी पढाओ ही घोषणा नीट लिहिता आली नाही. त्यांनी ‘बेढी पडाओं, बच्चाव’ असे लिहिले. केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांचा घोषणा लिहितानाचा फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून त्या सोशल मीडियातून चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.
मध्य प्रदेशातील धार जिह्यातील ब्रम्हपुंडी येथे ‘स्कूल चले हम’ या तीन दिवसीय प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांना निमंत्रित करण्यात आले होते. या सरकारी कार्यक्रमात त्या शिक्षा रथला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आल्या होत्या. ठाकूर यांनी या रथाच्या बाजूलाच बेटी बचाओ, बेटी पढाओची चुकीची घोषणा लिहिली. एका शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ असे लिहून करण्यात येणार होती; परंतु त्या फळय़ावर लिहिताना प्रचंड गोंधळल्या आणि चुकीची घोषणा लिहून ठेवली.
हे अत्यंत दुर्दैवी – काँग्रेस
नुकतीच लोकसभा निवडणूक जिंकलेल्या 12 वी पास खासदाराला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा कसा लिहायचा हेच कळत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य मुकाम सिंग अलवा यांनी फेसबुकवरून सावित्री ठाकूर यांच्यावर निशाणा साधला.
बारावी पास तरीही…
सावित्री ठाकूर यांच्या निवडणूक शपथपत्रानुसार त्या 12वी पास आहेत; परंतु फळय़ावर घोषणा लिहिताना त्यांचा प्रचंड गोंधळ उडाला. बारावी पास असताना त्या अशी चूक कशी करू शकतात. त्यांचे 12 वी पासचे प्रमाणपत्र खरे आहे की बोगस, असे अनेक प्रश्न नेटकरी विचारत आहेत.
n सावित्री ठाकूर यांनी कौतुकाने फळय़ावर घोषणा लिहिण्यास सुरुवात केली आणि मोबाईल कॅमेरे आणि पोटोग्राफरचे कॅमेरे त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सरसावले; परंतु ठाकूर यांना घोषणाच लिहिता येईना. ते पाहून अनेकांना अक्षरशः हसू फुटले.