अदानीचे स्मार्ट मीटर बसवायला ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना जुंपले

एकीकडे बेस्ट आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याने अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत असताना आता ग्राहकांचा विरोध असणारे अदानीचे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना जुंपल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याची बेस्ट प्रशासनाने आणि पालिकेने गंभीर दखल घेत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली आहे.

गेले काही दिवस बेस्ट उपक्रमाने स्मार्ट

मीटरिंग हा प्रोजेक्ट अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई यांना पुढील दहा वर्षांसाठी दिलेला आहे आणि या प्रोजेक्टनुसार बेस्ट उपक्रमातले जेवढे सध्याचे जे एनर्जी मीटर्स आहेत ते टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटरने बदलायचे आहेत. यासाठी कितीतरी हजार करोड रुपयांना हे कंत्राट अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या कंपनीला बहाल केलेले आहेत. तर या कंत्राटानुसार बेस्टमधील जेवढे विद्यमान एनर्जी मीटर्स आहेत ते सर्वच्या सर्व अदानी कंपनीने स्मार्ट मीटरने बदलणे अपेक्षित आहे. त्यानुसार त्यांचे कामही सुरू झालेले दिसते.

पण गेल्या काही दिवसांपासून उपक्रमामध्ये गुपचूपपणे उपक्रमाचा कर्मचारीवर्ग वापरून हे स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू आहे. म्हणजे कंत्राट दिले अदानीला, परंतु ते काम अदानीमार्फत न होता बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी वापरून बेस्ट उपक्रमाच्या कार्यवेळेत हे सर्व होत आहे. त्यामुळे अदानीला हे सर्व कंत्राट दिलेले असताना बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी वापरून हे काम का केले जातेय? हा नाहक भुर्दंड बेस्ट उपक्रमावर येतो असे प्रश्न निर्माण होत आहेत.

काम एक, खर्च डबल, प्रचंड भ्रष्टाचार

अदानी स्मार्ट मीटरसाठी पैसे घेत असून ते बसवण्याची जबाबदारीदेखील त्यांचीच असताना सुरू असलेला प्रकार पाहता एकाच कामासाठी बेस्ट उपक्रम दोन वेळा खर्च करीत आल्याचे समोर येत असून यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचाही संशय आहे. या सर्व कार्यपद्धतीमागे मोठे अधिकारी आहेतच, शिवाय नकळतपणे थोड्याफार तात्पुरत्या फायद्यासाठी बेस्ट कर्मचारीदेखील गुंतलेले दिसत आहेत. एकीकडे बेस्ट वाचवा असं जनआंदोलन उभे असताना आणि सर्वसामान्य नागरिकांना तीच भावना असताना आधीच आर्थिक संकटातील बेस्टची लूट सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.