मार्चमध्ये भारतातील ‘या’ 3 ठिकाणांना भेट द्या, गर्मीला करा टाटा बाय बाय

मार्च महिना आल्यावर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गर्मीला सुरुवात होते. अशावेळी फिरण्यासाठी पर्याय तुम्ही शोधत असाल तर असेच पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. भारतामध्ये सर्व ठिकाणी उकाडा असह्य होऊ लागला तर, तुम्हीही तुमची पावले या काही ठराविक ठिकाणी वळवू शकता. गर्मीतही मस्त एन्जाॅय करण्यासाठी भारतातील ही काही खास ठिकाणे तुमच्यासाठी.
ऋषिकेश
उत्तराखंडमधील ऋषिकेशला भेट देणे हा केव्हाही एक उत्तम पर्याय मानला जातो. मार्चमध्ये भारताच्या इतर भागांमध्ये उकाड्याला सुरुवात होते. परंतु उत्तराखंडमधील या भागात मात्र तुम्ही नक्कीच आरामदायक आनंद घेऊ शकता. भारतातील सर्वात उंच बंजी जंपिंगचा आनंद तुम्हाला येथे घेता येईल. त्याचबरोबरीने रिव्हर राफ्टिंग, जिप लाईनिंगचा थरारही तुम्हाला याठिकाणी अनुभवता येईल. उत्तरांखंडमधील ऋषिकेशमध्ये गेल्यावर आवर्जुन गंगा आरतीचा अनुभव घेण्यास विसरू नका.
कसे पोहोचाल
जवळील एअरपोर्ट– जाॅली ग्रांट
जवळील रेल्वे स्टेशन– हरिद्वार रेल्वे स्टेशन
मार्चमधील तापमान-15 ते 25 डिग्री
कुठे फिराल– लक्ष्मण झूला, राम झूला, वशिष्ठ गुफा, त्रिवेणी घाट, बीटल्स आश्रम
कोडाईकनाल
तामिळनाडूमधील कोडाईकनालला हिल स्टेशनची राजकुमारी असे संबोधले जाते. एखाद्या नटखट अवखळ राजकुमारीप्रमाणे कोडाईकनालचे सौंदर्य हे मंत्रमुग्ध करणारे आहे. कोडाईकनाल म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात डोंगररांगांमधून कोसळणारे अवखळ धबधबे. स्वच्छ नितळ पाण्याचे झरे आणि तळी हे कोडाईकनालचे खास वैशिष्ठ्य मानले जाते. कोडाईकनाल हे ट्रेकर्ससाठी खूप आवडते ठिकाण आहे. इथल्या डोंगररांगांमधून सायलिंग करु शकता तसेच इथल्या आसपासच्या ठिकाणांना ट्रेकिंग करत भेटही देऊ शकता.
कसे पोहोचाल
जवळील एअरपोर्ट– मदुराई
जवळील रेल्वे स्टेशन– कोडाई रोड
मार्चमधील तापमान-15 ते 25 डिग्री
कुठे फिराल– कोडाईकनाल धबधबा, पिलर राॅक्स, ब्रायंट पार्क, कोकर्स वाॅक
वायनाड 
केरळमधील वायनाड हे निसर्गप्रेमींसाठी एक हवेहवेसे ठिकाण आहे. वायनाड म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा आविष्कार असल्याचे म्हटले जाते. चारही बाजूंनी डोंगररांगांनी वेढलेले वायनाड हे कायम चित्रातील दृश्याप्रमाणेच भासते. गरम मसाल्यांचा डोंगरातील बागा, प्राचीन गुहा तसेच जंगली हत्ती यासारख्या विविध गोष्टी तुम्हाला येथे बघता येतील. शांतता आणि निसर्ग यांचा एक अदभूत मिलाफ तुम्हाला वायनाडला फिरताना पदोपदी जाणवेल.
कसे पोहोचाल
जवळील एअरपोर्ट– कालीकट
जवळील रेल्वे स्टेशन– नीलांबुर
मार्चमधील तापमान– 15 ते 25 डिग्री
कुठे फिराल– चेंबरा पीक, कुरुवा द्वीप, बाणासुर टेकडी, एडक्कल गुहा, थोलेपट्टी वन्यजीव अभयारण्य