‘बेस्ट’चा संप फसला, वाहतूक सुरळीत! सोशल मीडियावरील ‘नियोजना’ला ठेंगा

बोनस आणि प्रलंबित मागण्यांसाठी ऐन भाऊबीजच्या दिवसापासून सोशल मीडियावरून ‘बेस्ट’चा संप करण्याचे काही संघटनांचा प्रयत्न आज सपशेल फसला. या संपाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे एखाद दुसऱ्या डेपोचा अपवाद वगळता संपूर्ण मुंबईत बस वाहतूक सुरळीत सुरू होती. त्यामुळे ऐन भाऊबीज दिवशी लाडक्या बहीण-भावाचे हाल टळले.

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’ने दररोज 35 लाखांवर मुंबईकर प्रवास करतात. यामध्ये अगदी पाच रुपयांत पाच किमी, दहा रुपयांत दहा किमी, पंधरा रुपयांत पंधरा किमी आणि 20 रुपयांत मुंबईत कुठेही प्रवास करता येतो. त्यामुळे सर्वसामान्यांना अगदी घराजवळ घेऊन जाणारी बेस्ट पहिल्या पसंतीची ठरते. मात्र ऐन सणासुदीच्या दिवसांत संपाची घोषणा होत असल्यामुळे मुंबईकरांना दरवेळी प्रचंड हाल सहन करावे लागतात. या वर्षीदेखील नेमक्या भाऊबीजच्या दिवसापासून संप करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांमध्येही संभ्रमावस्था पसरली होती.

‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत येत्या 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी संप पुकारल्याबाबतचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. त्यामुळे कुठल्याही विभागातील शाखा अधिकारी किंवा विभाग अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या रजांची खातरजमा करावी आणि सक्षम कारण असले तरच सुट्टी द्यावी, असे परिपत्रकच जारी केले होते. मात्र ‘बेस्ट’चा संप फसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.

कोणत्याही संघटनेचा अधिकृत पाठिंबा नाही

दिवाळी बोनस, कोविड भत्ता, अ‍ॅग्रीमेंट आणि विलीनीकरण या मागण्यांसाठी 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी कामगारांनी संप पुकारला आहे. त्यामुळे वरळी, कुलाबा आणि इतर आगारांत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र या मेसेजबाबत कोणत्याही अधिकृत संघटनेने जबाबदारी घेतली नसल्याने हा संप फसल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियामध्ये ‘बेस्ट’ बंदबाबत कोणतेही मेसेज प्रसारित होत असले तरी ‘बेस्ट’ कामगार सेने’ने अशा प्रकारचा कुठलाही संप पुकारला नसल्याची माहिती बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली. आर्थिक संकटातून जाणाऱ्या बेस्टला कामगारांसह सर्वांनीच सहकार्य करण्याची गरज असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. आमचे लक्ष्य ‘बेस्ट’ वाचवण्याचे असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी उद्या महाव्यवस्थापक, पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.