‘बेस्ट’ चालकाची ऑनड्युटी दारू खरेदी

कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर भरधाव चालकाने 50 जणांना चिरडून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अंधेरीमध्ये एक बेस्ट चालक बस सायडिंगला लावून थेट वाईन शॉपमधून दारूची बॉटल खरेदी करून पुन्हा बस मार्गस्थ करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमुळे बेस्ट प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्हिडीओमध्ये अंधेरी पश्चिममधील एका रस्त्यावर बेस्ट चालक बस उभी करतो आणि थेट रस्त्यापलीकडच्या वाईन शॉपमध्ये जात असल्याचे दिसत आहे. वाईन शॉपमधून परत येताना त्याच्या हातात दारूची बॉटल असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी बसमध्ये प्रवासी पूर्ण क्षमतेने असताना थेट बस बाजूला उभी करून दारू कशी काय खरेदी करू शकतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.