‘बेस्ट’चा संप सुरूच, शेकडो बस डेपोतच, प्रवाशांचे हाल

best bus

बेस्टच्या कंत्राटी कामगारांना पगार मिळाला नसल्याने धारावी येथील बेस्टच्या काळाकिल्ला आगारातील ओलेक्ट्रा बस कंपनीच्या कंत्राटी चालकांनी गुरुवारी दुपारपासून संप पुकारला आहे. हा संप आजही सुरू राहिल्याने शेकडो बस आगारातच उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. पगार मिळेपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा चालकांनी घेतल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

कंत्राटदाराने पगार दिला नसल्याने संप होत असल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. 2019 पासून या भाडेतत्त्वावरील बस लादल्याने हा प्रकार घडले आहेत. आतापर्यंत 18 वेळा संप घडले आहेत. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टच्या कर्मचाऱयांना दोन दोन दिवस आगारातच राहावे लागते. त्यामुळे बेस्टने चार हजार गाडय़ा स्वमालकीच्या घ्याव्यात यासाठी जनआंदोलन छेडण्यात येईल, असे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.

द बर्निंग ‘बेस्ट’
गोरेगाव पश्चिम, लिंक रोडजवळील बेस्टच्या ओशिवरा आगारात भाडेतत्वावरील बंद पडलेल्या बसच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना दुपारच्या सुमारास बसला अचानक भीषण आग लागल्याने खळबळ उडाल्याची घटना आज घडली. सुदैवाने अग्निशमन दलाने सदर आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठ अनर्थ टळला असून सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.